Private Advt

अनाथ बालकाचे पालकत्व आमदारांनी स्वीकारले

आमदार चंद्रकांत पाटील यांची सहृदयता : मातृ-पितृछत्र हरपलेल्या बालकाच्या शिक्षणाची घेतली जवाबदारी

मुक्ताईनगर : तीर्थक्षेत्र मुक्ताईच्या दरबारात बाल मनावर सु-संस्कार व धर्म, संस्कृती, अध्यात्म शिक्षण देऊन वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविले जात आहेत. येथे आळंदीसह बुलढाणा, अकोला, जळगाव व धुळे जिल्ह्यातून किमान दोनशेवर बालकांनी हजेरी लावली आहे. हे शिबिर श्रीमंत संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची, ता.खेड, जि.पुणेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. रविवार, 1 मे पासून या शिबिराला प्रारंभ झाला आहे तर रविवार, 15 मे रोजी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र हरणे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने शिबिराची सांगता होईल.

आमदारांनी स्वीकारले पालकत्व
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच भेट दिली व बालकांना मार्गदर्शन करून अगदी कमी वयात अध्यात्माची उंची गाठणार्‍या व आपल्यासह इतरही बालकांवर वारकरी संप्रदायाचे संस्कार व्हावे हा उदात्त हेतू उराशी बाळगून शिबिराचे आयोजन करणार्‍या स्वप्नील महाराज, आळंदीकर यांचे कौतुक केले व आई मुक्ताई तुमच्या कार्यास सिद्धी नेवो, अशी भावना व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. शिबिराचे आयोजक हे आई-वडील नसलेल्या किमान 10 मुलांचे संगोपन करीत असल्याची माहिती मिळाली. त्यातील अगदी 6 वर्षाचा चिमुकला त्यांनी पाहिला ज्याचे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे त्या बालकाला पाहून आमदार चंद्रकांत पाटील यांना गहिवरून आले व त्यांनी स्वप्नील महाराज यांना सूचना केली की या मुलाचे पुढील शिक्षणाच्या सर्व खर्चाचे पालकत्व मी घेतो. आणखी काही पालकत्व हरपलेले बालक असतील त्यांची माहिती द्यावी, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
आमदार पाटील यांची बाल संस्कार शिबिराला दिलेली भेट ही पालकत्व हरपलेल्या बालकासाठी आयुष्याची कलाटणी देणारी ठरली. आमदारांनी एका सेकंदात बालकाचे शिक्षणाचे पालकत्व घेतल्याने एक उदार मनाचे भावनिक राजकीय व्यक्तिमत्त्व चंद्रकांत पाटलांच्या रूपाने येथे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, गटनेता निलेश शिरसाट, नगरसेवक पियूष मोरे, संतोष मराठे, माऊली महाराज (कर्की), हभप दुर्गाताई संतोष मराठे, भूषण महाराज (पिंपरी अकराउत), अनिल मराठे महाराज, बाळू सोनार आदींची उपस्थिती होती.