अनन्वित अत्याचारानंतर उमर फैयाज यांची हत्या

0

नवी दिल्ली । काश्मीरमधून अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या लेफ्टनंट उमर फैयाज यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फयाझची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे त्यांच्या शरीरावरील जखमांवरून दिसून आले आहे. राजपुताना रायफल्समध्ये लेफ्टनंट असलेल्या उमर फयाझ यांचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला होता.

लेफ्टनंट पदावर कार्यरत असलेल्या फैयाज यांच्या शरीरावरील अनेक भागांवर मारहाणीच्या खुणा आहेत. यासोबत दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे फयाझ यांच्या शरीराची अक्षरश: चाळण झाली आहे. फयाझ यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी दहशतवाद्यांनी रायफलच्या दस्त्याने त्यांना मारहाण केली. यासोबतच फैयाज यांच्या जबड्यावर आणि पोटावरदेखील अनेक जखमा आढळल्या होत्या. त्यामुळे फैयाज यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर निर्दयीपणे अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

पाच महिन्यांपूर्वी झाली होती नेमणूक
अवघ्या पाच महिन्यांपूर्वी उमर फयाझ यांची नेमणूक राजपुताना रायफल्समध्ये करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच उमर फैयाज आपल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काश्मीरमध्ये परतले होते. ‘संकटाची पूर्वकल्पना असतानाही दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील आपल्या गावात उमर फैयाज शस्त्रांशिवाय गेले होते,’ अशी माहिती त्यांच्या सहकार्‍यांनी दिली. ‘उमर फै याज नेहमीच उत्सुक असायचा. त्याला आयुष्यात काहीतरी सिद्ध करायचे होते. ते कायमच त्याच्या डोळ्यात दिसायचे. त्याच्याबद्दलची ही गोष्ट मला नेहमीच आवडायची,’ असे मेजर अवदेश चौधरी यांनी सांगितले. चौधरी यांनी दिल्लीतील रेजिमिंटमध्ये उमर फै याजला प्रशिक्षण दिले होते.

परतण्याचा विश्‍वास होता
लेफ्टनंट उमर फैयाज यांचा मृतदेह बुधवारी सकाळी शोपियनमध्ये आढळून आला होता. उमर फयाझ यांचे त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातून अपहरण करण्यात आले होते. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास अपहरण झालेल्या फैयाज यांचा मृतदेह त्याच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर सापडला होता. फैयाज नक्की परतेल, असा विश्‍वास कुटुंबियांना असल्याने त्यांनी त्याच्या अपहरणाची तक्रार नोंदवली नाही. अवघ्या 22 वर्षांच्या फैयाज उमर यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.