अनधिकृत हॉटलेवर अतिक्रमण पथकाची कारवाई

0

जळगाव । रामानंदनगर परिसर शास्त्री नगरात सामासिक अंतरावर अनधिकृत बांधकाम करुन सनराईज हॉटेल सुरु करण्यात आले होते. या हॉटेलचे 10 बाय 30 करण्यात आले होते. याबाबत नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी महानगर पालिकेत तक्रार केली होती. या तक्रारीनुसार महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने हे अनधिकृत बांधकाम शुक्रवार 13 जानेवारी रोजी उध्वस्त केले.

शहरातील मोठी लोकावस्ती असलेल्या शास्त्रीनगर भागात सनराईज हॉटेल बंद करण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबविली होती. तसेच त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून आपली तक्रार मांडली होती. या हॉटेलचे सामासिक जागेत अनधिकृत बांधकाम देखील करण्यात आले होत. बेंडाळे यांनी महापालिका प्रशासनानकडे तक्रार केली होती.

हॉटेल मालकाने पथकास केला होता विरोध
या तक्रारीवरुन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी दुपारी हॉटेलचे अनधिकृत केलेले बांधकाम तोडले. काहीवेळ हॉटेल मालकाने पथकास विरोध केला होता. यावेळी महापालिकेच्या अभियंत्यांनी त्यास हे बांधकाम अनधिकृत असल्याचे समजावून सांगीतले त्यानतंर पथकातील कर्मचारी यांनी हॉटेलची भिंत व बाहेरच्या बाजूचे बांधकाम पाडले. ही कारवाई नगररचना विभागातील समिर बोरोले, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांच्यासह पथकाने पार पाडली.

रामानंद नगर परिसरातील सनराईज हॉटेल सारख्या अतिक्रमणावर कारवाई करत असतांना एकट्या सनराईज हॉटेलवर कारवाई का करण्यात आली याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी आयुक्तांकडून पत्राद्वारे विचारणा केली होती. जिल्हाधिकार्‍यांचा उत्तर देतांना आयुक्तांनी अशा प्रकारच्या अतिक्रमणवर कारवाई करण्यासंदर्भात सकारात्मकता दाखविली आहे. तहसिलदार अमोल निकम यांनी आयुक्तांची भेट घेवून शासकीय पथक बनवून एकत्रित कारवाईचा प्रस्ताव ठेवला.