अनधिकृत बांधकामे करुन कर बुडविण्याचे प्रकार सुरु

0

वरणगाव। शहरातील विविध प्रभागात पालिकेची रितसर परवानगी न घेता लोकप्रतिनिधींच्या अर्थपूर्ण धोरण सांभाळून छुप्या मार्गाने अनधिकृतरितीने बांधकामे सुरु असून पालिका प्रशासनाचा कर बुडविण्याचे प्रकार सुरू आहे. याकडे पालिका मुख्याधिकारी लक्ष देतील का? अशी नागरीकांमध्ये चर्चा आहे.

लाखो रुपयांचा व्यवहार करून खरेदी-विक्री
तत्कालीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागातील 100 रुपयाच्या मुद्रांक पेपरवर 11 महिन्याच्या करारावर जागा भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या आहेत तर त्यातील काहींनी लाखो रुपयांचा व्यवहार करून खरेदी विक्री केलेल्या आहे तर नियमानुसार 11 महिन्याच्या करारावर दिलेले भूखंड शासनास गरज निर्माण झाल्यास परत घेतले जाते.

स्वतःच्या नावे भूखंड हस्तगत
त्याकरीता कच्चे बांधकाम करणे गरजेचे असते. मात्र या ठिकाणी करारदारांकडून पक्के व काँक्रिटीकरण बांधकामे केली जात आहे. मात्र काही राजकारणी मंडळीनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावे भूखंडे हस्तगत केली आहे.

विना परवाना बांधकामे
तसेच त्रयस्थ नागरीकांना भाड्याने देवून महिन्याकाठी हजारोंचे उत्पन्न मिळविले जात आहे. तसेच याच माध्यमातून मिळविलेल्या भूखंडावर पक्की बांधकामे लोकप्रतिनिधींच्या आर्थिक तडजोडी व छुप्या आशीर्वादाने मुख्य रस्त्यालगत तीन ते चार ठिकाणी विनापरवाना बांधकामे सुरू असतांना दिसून येत आहे. यावर मुख्याधिकारीनी लक्ष देतील का? अशी नागरीकांमध्ये चर्चा आहे.