अध्यात्मिकतेचा संदेश देत चाळीसगावात संदेश यात्रा

0

चाळीसगाव । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्री निमित्त शिवदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 27 फेबु्रवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी 20 रोजी शहरातील सिताराम पैलवान यांच्या 30 हजार चौ.फुटापेक्षा जासत क्षेत्रात महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान शिवदर्शन महोत्सवाच्या निमित्ताने शहरातुन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतुन आध्यात्मिकतेविषयी प्रबोधन करण्यात आले. आठवडाभर चालणार्‍या या महोत्सवाच्या माध्यमातून विविध मॉड्यूल, ध्वनी आणि प्रकाशाचे मिश्रण असलेल्या आध्यात्मिक प्रतिकृतीद्वारे आध्यात्मिके संबंधी प्रबोधन केले जाणार आहे. महोत्सवात व्यसनमुक्तीसाठी विशेष स्टॉल लावण्यात आले असून त्याद्वारे समूपदेशनाबरोबर व्यसनमुक्तीसाठी औषधीही सूचविण्यात येणार आहेत. विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करणारी ग्रंथप्रदर्शन, दृकश्राव्य साहित्य, ऑडिओ, व्हिडीओ सीडीज् सुध्दा नागरीकांसाठी उपलब्ध असणार आहे.

लक्ष्मीनगर स्थित सेवाकेंद्रातून ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, नगरसेविका झेलाबाई पाटील, न.पा.गटनेता राजु चौधरी, योगीनी ब्राह्मणकर, भूषण ब्राह्मणकर, प्रकाश पाटील, रमेश शिंपी, मयूर पाटील, युवराज पाटील, विजय सोनार, जितेंद्र ठाकूर, डॉ. अनिल साळुंखे, अ‍ॅड. सुप्रिया साळुंखे, संजय माळी आदींच्या हस्ते रॅलीस भगवान शिवध्वज दाखवून सुरुवात झाली. शुभ्रवस्त्र आणि सुहास्य वदनाने दोन-दोनच्या रांगेत शिस्तबद्ध पध्दतीने ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाचे स्वयंसेवक प्रबोधन करीत शहराच्या मुख्य रस्त्यांवरुन जात असतांना नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते. रॅलीत अग्रभागी प्रबोधन वाहन होते. त्यानंतर मोटारसायकल आणि शेवटी शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य सांगणारा प्रदर्शनी रथ होते. मिरवणुकीस सेवाकेंद्रापासून सुरुवात होऊन सिताराम पैलवान मळा, एम.के. अण्णा बंगला, गजानन महाराज मंदिर, अभिनव शाळा, खरजई नाका, भडगाव रोड, शिवाजी चौक, घाट रोड , दत्त वाडी, स्टेशन रोड, हिरापूर रोड ,रेल्वे स्टेशन, हनुमान वाडी मार्गे धुळे रोड, शिवकॉलनी, अक्षदा मंगल कार्यालय, न्यायालय, सिग्नल पॉईन्ट मार्गाने ब्रह्माकुमारीज् लक्ष्मीनगर सेवाकेंद्रात सांगता झाली. सर्व नागरीकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजनकांनी केले आहे.