अधिकार्‍यांची मनमानी अन् छावा पदाधिकारी भडकले

0

जळगाव : जिल्हा रूग्णालयातील प्रशासकीय अधिकार्‍यांची नेहमीच असलेलेल्या दांड्या, नाशिक येथुन कारभार चालविण्याची पध्दत, त्यासाठी कर्मचार्‍यांची होत असलेली दमछाक, सिव्हीलमधील दुर्गंधीयुक्त वातावरण आणि वर्ग चार कर्मचार्‍यांची डयुटी कशा पध्दतीने लावली जाते? असे एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार गुरूवारी आरोग्य उपसंचालक डॉ. एल.आर घोडके यांना करत छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सिव्हीलचा मनमानी कारभार चव्हाटयावर आणत चांगलाच गोंधळ घातला. डॉ. घोडके या गुरूवारी सिव्हीलमध्ये आल्या होत्या. एकूणच कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांची बैठक सिव्हील सर्जन यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भामरे, प्रभारी शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. ही बैठक सुरू असतानाच सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास छावाचे संतोष पाटील यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी सिव्हील गाठले. प्रथम आरोग्य उपसंचालक डॉ.घोडके यांची भेट घेवून मागणी निवेदन सादर करून तक्रारी मांडल्या.

सहीसाठी शिपाई जातो नाशिक
छावाचे संतोष पाटील आरोग्य उपसंचालक डॉ. घोडके मॅडम यांना सांगितले की, प्रशासकीय अधिकारी दारू पिऊन येतात. दरम्यान, अधिकारी महिन्यातून चार ते पाच वेळा येतात व नाशिकहून कारभार चालवतात. त्यांची सही घेण्यासाठी शिपाई नाशिक जातो. येथुन अधिकार्‍यांनी फोन केला तेव्हा ते नाशिकहुन येतात. ही मनमानी खपवून कशी घेताहेत? की सीएस त्यांना घाबरतात? यावेळी हस्तक्षेप करून सिव्हील सर्जन डॉ. भामरे म्हणाले, नाही तसे नाही. मग काय कारवाई केली ते सांगा? असा प्रतिप्रश्न पदाधिकार्‍यांनी केल्यावर त्यांची बोलती बंद झाली.

अन्…पदाधिकारी भडकले…
आरोग्य उपसंचालक घोडके यांनी निवेदन घेतल्यानंतर चौकशी करावी लागेल. त्याशिवाय कारवाई करता येणार नाही. आम्ही महत्वाचे काम करतोय! असे म्हणताच
छावाचे पदाधिकारी भडकले व मॅडम जनतेचे प्रश्नही महत्वाचे असतात. आणि जनतेला जाब विचारण्याचा हक्क आहे असे जाब विचारले. यावर मॅडम नरमाईची भूमिका घेत म्हणाल्या, तुम्ही ज्या तक्रारी केल्या, त्यांची चौकशी करू, अशी कारवाई करता येणार नाही. मग दारू पिऊन डयूटीवर येणे गैर नाही का? या प्रश्नावर उपसंचालक मॅडम म्हणाल्या, दारू प्यावी असे पत्र आम्ही काढले नाही. पण कोणी दारू पिऊन येऊ नये,असे पत्र मी काढेल.असे त्यांनी यावेळी पदाधिकार्‍यांना सांगितले.

सफाईसफाईला कर्मचारीच नाहीत
पदाधिकार्‍यांनी सिव्हीलमधील साफसफाईचा मुददा उपसंचालकांसमोर मांडला. नाकाला रूमाल बांधूनच दुर्गंधीतून सिव्हीलच्या वार्डात जावे लागते. अधिकारी फिरकत नसल्याने त्यांना याची कशी कल्पना येईल. त्रास रूग्ण आणि नातेवाईकांना होतो. साफसफाईला कर्मचारी नाहीत. काही कर्मचारी पैसे जमा करतात. साफसफाई कशी
होते हे कोण बघणार? बाहेरचे हॉस्पिटल पहा आणि जळगाव हॉस्पिटलची दुरावस्था बघा. थम्ब मशीन बंद आहे. मग कशासाठी थम्ब दाबण्याचे नाटक करतात, रूग्णांना बाहेरून गोळया, औषधी घ्याव्या लागतात असे त्यांनी तक्रारी मांडून सिव्हीलचा भोंगळ कारभार उपसंचालकांसमोर मांडला.

शिष्टमंडळास दिले आश्‍वासन
प्रशासकीय अधिकारी एस.पी.बेंद्रे यांच्या गैरवर्तवणुकीची गंभीर दखल घेऊन आरोग्य उपसंचालक डॉ.घोडके यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले. तसेच याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून संपूर्ण चौकशी अंती कारवाई केली जाईल. यावेळी सिव्हीलमधील बरेच डॉक्टर डयूटीवर येत नाहीत, ते बाहेर प्रॅक्टीस करतात असेही आरोप करण्यात आले. अशा डॉक्टरांचे पुरावे असतील तर कारवाई करू, असे त्यांनी सांगीतले. सिव्हीलमधील डॉक्टरांच्या रिक्तपदे भरण्याच्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.