अधिकार्‍यांकडून दोन तास चौकशी!

0

जळगाव। शि रसोली रस्त्यावरील श्यामा फायर वर्क्स या फटाका निर्मिती कारखान्यात मंगळवारी दुपारी 3.50 वाजता मिक्सिंग रूममध्ये भीषण स्फोट होवून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर एक महिला कामगार गंभीर जखमी झाली होती. यातच घटनेच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी कारखान्याच्या परिसरात स्मशान शांतता दिसून आली. दरम्यान, कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी कारखान्यात येऊन चौकशी करत संपूर्ण कामगाजाची माहिती घेतली.

स्फोटात दोघांचा मृत्यू
राजेंद्र बाबुराव तायडे (वय 35) आणि हेमंत प्रेमलाल जयस्वाल (वय 45) हे मंगळवारी दुपारी 3.45 वाजता दोघे क्रमांक 1 च्या खोलीत सफाई करण्यासाठी गेले. त्यानंतर पाच मिनिटात म्हणजे 3.50 वाजता अचानक त्या खोलीतील रसायनांचा भीषण स्फोट झाला. त्यात खोलीच्या चारही भिंतीसह आजुबाजुच्या संरक्षण भिंतीही जमीनदोस्त झाल्या. खोलीत असलेले राजेंद्र आणि हेमंत यांचे अक्षरश: तुकडे झाले. स्फोट झाला त्यावेळी गीताबाई कन्हय्या मोची (वय 38, रा. फुकटपुरा) या बाजुने जात होत्या. त्यावेळी विटेचे तुकडे त्यांच्या डोक्यात जोरात लागल्याने त्या खाली पडल्या. त्यांच्या तोंडालाची गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गिताबाई यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

कारखाना परिसरात स्मशान शांतता
मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे बुधवारी श्यामा फायरवर्क्स इंडस्ट्रीज हा फटाक्यांचा कारखाना बंद होता. त्या ठिकाणी केवळ पोलिस कर्मचारी, काही कारखान्याचे कर्मचारी आणि मालक विशन मिलवाणी उपस्थित होते. कंपनीचे सर्व कामगार राजेंद्र आणि हेमंत यांच्या अंत्ययात्रेसाठी गेेलेले होते. यातच दुपारी 3 वाजेच्या सुमारास राजेंद्र व हेमंत यांच्यावर नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार केले. दरम्यान, या घटनेमुळे मयतांच्या कुटूंबियांना धक्काच बसला असून त्यांनी त्या ठिकाणी देखील हंबरडा फोडला.

दोन तास चौकशी
श्यामा फायर वर्क्स येथे मंगळवारी झालेल्या घटनेनंतर कामगार आयुक्त कार्यालयाचे कामगार अधिकारी पी. बी. चव्हाण यांनी बुधवारी कारखान्यात येऊन चौकशी केली. त्यात कारखान्यात किती कामगार आहेत. त्यापैकी किती कायम आणि किती कंत्राटी आहेत. तसेच कामागारांसाठी काय सोई, सुविधा आहेत. मालक कोण आहेत. कोणाचे काय काम आहे. कामगार प्रशिक्षीत आहेत किंवा नाही. या संदर्भात दोन तास चौकशी केली. तसेच त्यांनी सर्व महत्त्वाचे कागदपत्रे तपासली.

आमदार सोनवणेंची घटनास्थळी भेट
चोपडा विधानसभाक्षेत्राचे शिवसेनेचे आमादार चंद्रकांत सोनवणे यांनी बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घटनास्थळाला भेट दिली. आमदार सोनवणे हे मिलवाणी यांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी मिलवाणी यांचे कारखान्यात जाऊन सांत्वन केले. दरम्यान, श्यामा फायरवर्क्स इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात राजेंद्र तायडे, हेमंत जयस्वाल ठार झाले होते. बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांचे मृतदेह कामगार वस्तीत आणण्यास आले. कंपनीच्या मालकांनी प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश त्यांच्या पत्नीच्या नावाने दिला. त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोघांवर अंत्यस्कार करण्यात आले.