अधिकारी, कर्मचार्‍यांनी घेतली सुरक्षिततेची शपथ

0

भुसावळ । दीपनगर विद्युत केंद्रात सकाळी 10 वाजता 210 मेगा वॅटच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यावर मुख्य अभियंता अभय हरणे यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षिततेची शपथ दिली. यावेळी माधव कोठुळे आणि उपमुख्य अभियंता नितीन गगे तसेच अधिक्षक अभियंता सी.जे. निमजे, यांनी आपल्या मनोगतातून जीवनातील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य अभियंता अभय हरणे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या केंद्राने मागील वर्षात शून्य अपघात म्हणून नोंद केल्याबाबत अभिनंदन केले. कोणत्याही उद्योगासाठी तेथील मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचे असते. जीवनात सुरक्षिततेला अग्रस्थान दिले पाहिजे. आपण कामावर असा अथवा घरी असा, प्रवासात असा नेहमी सतर्क रहावे. अतिआत्मविश्वास, अज्ञान आणि आळस अपघाताला आमंत्रण देतो. सुरक्षा सप्ताहात सर्वांनी सहभागी होऊन सर्व स्पर्धा यशस्वी करा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सुरक्षितता अधिकारी डी डी पिंपळे यांनी केले. तसेच पथनाट्य, घोषवाक्य, निबंध, भित्तीचित्र आणि प्रश्न मंजुषा स्पर्धांचे आयोजन बाबत माहिती दिली. यावेळी अधिक्षक अभियंता एम.पी. मसराम, राजेश राजगडकर, विजय बारंगे, एम.बी. पेटकर, एम.बी. अहिरकर, सी.एन. निमजे, एन.आर. देशमुख जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार तसेच सर्व विभाग प्रमुख, कंत्राटी कर्मचारी आणि महिलावर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर सूर्यवंशी, छगन पवार, धनराज साळवे आणि मोहिनी फेगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.