अधिकारी, कंत्राटदाराला काळे फासणार

0

शिवसेनेचा इशारा : सात दिवसात गुन्हे दाखल मागणी

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदरीकरण यामुळे गेल्या तीन वर्षात हजारो लोकांची या रस्त्यांनी बळी घेतला आहे. यानंतरही अपघातांच्या संख्येत प्रशासनाच्या नातकर्तेपणामुळे वाढ होत आहेत. या अपघात तसेच त्यात बळी गेल्याच्या घटनांना जबाबदार असलेल्या ‘नही’चे संचालक, रस्त्याचे प्रोजेक्ट इंचार्ज या सर्वांविरुध्द सात दिवसाच्या आत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबत शिवसेनतर्फे माजी महानगर प्रमुख गजानन मालुपरे यांच्या गुरुवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

एरंडोल व पिंंपळकोठा या दरम्यान महामार्गावर सोमवारी ट्रक व कालीपीलीच्या अपघातात नऊ प्रवाशांचा बळी गेला व 11 जण जखमी झाले. खराब रस्ते, त्यावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदरीकरण या घटनेला जबाबदार असल्याने शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालुपरे यांनी गुरुवारी जिल्हा पेठ पोलिसांकडे लेखी तक्रार देवून या अपघातांना जबाबदार असलेल्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही लेखी तक्रारच फिर्याद समजावी. पाच दिवसात चौकशी करावी व सात दिवसात गुन्हा दाखल करावा असा अल्टिमेटम मालपुरे यांनी पोलिसांना दिला. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी तक्रार स्विकारल्यानंतर याप्रकरणात चौकशी करुन न्याय देवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

जनतेसाठी अंगावर गुन्हे घेऊ

गजानन मालपुरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, महामार्गावर निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यात सरकारी अधिकारी व कंत्राटदार याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आता अंत संपला आहे. सात दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल, त्यात अधिकारी व कंत्राटदारांना काळे फासू, कार्यालयात जावून ठोकून काढले जाईल. जनतेसाठी अंगावर गुन्हे घेण्याची तयारी आहे. पोलिसांना गुन्हे दाखल करायला भाग पाडले जाईल, असे मालपुरे यांनी सांगितले. यावेळी नीलेश पाटील, राजेंद्र पाटील, चेतन प्रभुदेसाई, लोकेश पाटील, राहूल नेतलेकर, सुनील ठाकूर, भैय्या वाघ, महेंद्र सोनवणे, बापू मेने, राहूल शिंदे, विजय चौधरी, विक्की पाटील, विनायक पाटील, ललित कोतवाल, स्वप्नील घुगे, विराजय कावडिया, अमित जगताप व भाजपचे अशोक लाडवंजारी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षकांसोबत केली चर्चा

गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला जमण्याचे आवाहन केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गजानन मालपुरे यांना चर्चेसाठी बोलावले. त्यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी रजेवर गेले असून ते आल्यानंतर 30 किंवा 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, नहीचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन कामाची दिशा ठरविली जाईल, असे आश्वासन डॉ.उगले यांनी दिल्यानंतर आज गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज दिला असे मालपुरे यांनी सांगितले.

Copy