अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या दुकानात 55 वर्षापुढील मालक व मजूर आढळल्यास दुकान होणार सील

0

प्रांताधिकारी अजित थोरबोले यांचे आदेश : नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन

फैजपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या दुकानांमध्ये 55 ते 60 वर्षे वयोगटातील दुकान मालक अथवा त्या ठिकाणी त्या वयोगटातील मजूर आढळल्यास दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी काढले आहेत. याच वयोगटातील नागरीकांनी आदेशाचे उल्लंघण केल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना
प्रांताधिकारी थोरबोले यांनी काढलेल्या आदेशात राज्यात 14 मार्चपासून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून कोरोनाची बाधा होणार्‍या व्यक्तींचे प्रमाण हे साधारणतः 55 ते 60 वयोगटातील असल्याने हे आतापर्यंतच्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले आहे त्यामुळे या वयोगटातील व्यक्ती कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. असे असताना अनेक ठिकाणी फळ विक्री, किराणा दुकानदार, भाजीपाला व विक्री करणारे व्यापारी तसेच अन्य अत्यावश्यक सेवा देण्यासाठी परवानगी दिलेल्या दुकानांमध्ये बर्‍याच ठिकाणी 55 ते 60 वर्षे वयोगटातील दुकानमालक, मजूर काम करीत असताना व खरेदीसाठी त्याच वयोगटातील नागरीक येत असल्याचे दिसून येत आहे तर त्यांच्यासोबत लहान मुलेसुद्धा येतात त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन होताना दिसत नाही. या वयोगटातील व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असल्याने व अशा व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग व अन्य आजाराचे प्रमाण असल्याने अशांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते त्यामुळे दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरीक वयोगटातील व्यक्तींना पायबंदी घातलेली आहे तसे आढळल्यास दुकाने सील करण्याची स्थानिक स्वराज्य व पोलिस प्रशासन यांना आदेश करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघण करणार्‍या नागरीकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी थोरबोले यांनी आदेशात म्हटले आहे.

Copy