Private Advt

अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रांत कार्यालयातील बैठकीत सूचना

भुसावळ : शहरासह तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी नसली तरी शेतकर्‍यांचे पावसामुळे नुकसान झाले असून उडीद व मुग पीक हातचे गेले तर कापूस, कांदा, मका आदी पिकांचेही नुकसान झाले आहे. कापूस पिकाची बोंडे कुजल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला गेल्याने भुसावळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये दोन दिवसांत पंचनामे करावेत, असे आदेश आमदार संजय सावकारे यांनी येथे दिले. सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात महसूल व कृषी अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

यांची बैठकीला उपस्थिती
पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या आढावा बैठकीला तहसीलदार दीपक धिवरे, तालुका कृषी अधिकारी माळी यांच्यासोबत मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते. आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदारांकडून तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. यावेळी 12 गावांमधील 184 हेक्टर क्षे़त्रावर झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, भुसावळ तालुक्यात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाच्या हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करुन महसूल व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी प्रक्रिया करावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी केली.

तक्रारी स्वीकारून पंचनामे करा
शेतकरी पंचनामे करीत नाहीत किंवा ग्रामीण भागात तलाठी, कृषी सहाय्यक मिळत नाही यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडतात. तहसील कार्यालय तसेच तालुका कृषी कार्यालयातही शेतकर्‍यांच्या नुकसानीबाबतच्या तक्रारी स्विकारून पंचनामे करण्यात यावे, अशी अपेक्षाही आमदारांनी व्यक्त केली. यावर तहसील कार्यालय व कृषी कार्यालयात शेतकर्‍यांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी काही दिवस स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.