अतिक्रमितांना मिळाला तात्पुरता निवारा ; पंतप्रधान योजनेतून लाभार्थींना मिळणार घरे

0

भुसावळातील उपोषणाची आमदार संजय सावकारेंच्या शिष्टाईने सांगता ; आधी फिस्कटली चर्चा नंतर आले यश ; उपोषणार्थी म्हणाले, आश्‍वासन न पाळल्यास सामूहिक आत्मदहन

भुसावळ- सुमारे तीन पिढ्यांपेक्षा अधिक काळापासून रहिवासी असलेल्या रेल्वे परीसरातील अतिक्रमीत झोपडपट्टीधारकांच्या घरांवर रेल्वे प्रशासनाने बुलडोझर फिरवल्यानंतर बेघर झालेल्या कुटूंबियांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले होते तर सलग तिसर्‍या दिवशीही सायंकाळपर्यंत उपोषण सुरूच होते. आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पंतप्रधान आवास योजनेतून घर देण्याचे सकारात्मक आश्‍वासन दिल्यानंतर उपोषणार्थींनी लेखी पत्रही स्वीकारले मात्र ऐन शेवटच्या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी ठोस लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला. यानंतर उपोषणार्थीच्या काही पदाधिकार्‍यांसोबत प्रांतांच्या दालनात दीर्घ वेळ चर्चा झाल्यानंतर राहुल नगरामागील जागेवर तात्पुरत्या निवार्‍याची सोय करून देण्याचे तसेच दोन महिन्यात पंतप्रधान घरकूल योजनेला परवानगी मिळवून लाभार्थींना हक्काचे घर देण्याचे आश्‍वासन आमदारांनी दिल्यानंतर उपोषणार्थींनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्‍वासन पाळावे अन्यथा उपोषणार्थींमधील दहा जणांचे शिष्टमंडळ सामूहिक आत्मदहन करेल व त्याची जवाबदारी लोकप्रतिनिधी, प्रशासनावर राहिल, असा इशारा शिष्टमंडळातील गणेश सपकाळे यांनी प्रसंगी दिला.

हक्काची जागा मिळण्यापूर्वीच जागेचे सपाटीकरण
अतिक्रमितांच्या पुर्नवसनासंदर्भात चर्चा सुरू असताना राहुल नगरामागील पर्यायी जागेचा प्रश्‍न समोर आल्यानंतर बुधवारी सकाळीच पाच जेसीबीद्वारे जागेच्या सपाटीकरणाला सुरुवात करण्यात आली तर काहींनी तेथे मार्किंगही करून टाकली. याप्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी, जनआधारचे उल्हास पगारे, सचिन चौधरी यांच्यासह राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे व विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. या जागेचे नेमके सपाटीकरण कुणी केले? त्यासाठी खर्च कुणी केला याची जवाबदारी मात्र कुणीही घेतली नाही तर नागरीकांनी स्वतःहून पुढाकार घेतल्याची चर्चादेखील ऐकण्यास मिळाली.

आधी फिस्कटली चर्चा नंतर आले यश
बुधवारी सायंकाळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, रमेश मकासरे यांनी उपोषणार्थींशी चर्चा केली तसेच प्रशासनातर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, डीवायएसपी गजानन राठोड यांनी केलेल्या चर्चेला यशदेखील आले शिवाय प्रांतांच्या स्वाक्षरीचे पत्रही उपोषणार्थींना देण्यात आले मात्र अचानक उपोषण सुटत असताना उपोषणार्थींनी जिल्हाधिकारी गुरूवारी भेट द्यावी, अशी मागणी लावून धरत त्यांच्या ठोस आश्‍वासनाशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला त्यामुळे लोकप्रतिनिधी पुन्हा प्रांत कार्यालयात परतले. येथे पुन्हा काही पदाधिकार्‍यांसह बाळा पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत उपोषणार्थींचे मन वळवण्यात यश आले तर सायंकाळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी उपोषणार्थींची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेत त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

अतिक्रमितांना मिळणार हक्काची घरे ; चर्चेला यश
उपोषणार्थींशी चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर पंतप्रधान आवास योजनेतून सर्व अतिक्रमितांना घरे देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यासाठी सर्वांचे फार्म भरून घेण्यात येणार असून दोन महिन्यात या योजनेला मंजुरी आणण्याचे आश्‍वासन आमदारांनी दिले तसेच तात्पुरता अतिक्रमितांना राहुल नगरामागील शासकीय भूखंडावर तात्पुरता रहिवासाची परवानगी देण्यात आल्यानंतर उपोषणार्थींनी आपला पवित्रा बदलला. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, डीवायएसपी गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदींनी उपोषणार्थींना पाणी देवून त्यांचे आमरण उपोषण सोडवले.

राजकारण आल्याने प्रांतांना पाठवले -आमदार सावकारे
अतिक्रमितांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली जाणार असून त्यासाठी त्यांचे फार्म भरण्यात येणार आहे. दोन महिन्यात या योजनेला मंजुरी देण्याचे आपण आश्‍वासन दिले शिवाय तात्पुरता राहुल नगरामागील जागेवर अतिक्रमितांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सतारे शिवारातील 104/6 क्रमांकाच्या भूखंडावर नियोजित घरकुले बांधण्याचा विचार असून राहुल नगरामागील जागेवरही ही योजना राबवता येवू शकते, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. उपोषण सोडवताना राजकारण आल्याने व काही लोक तेथे आल्याने आपल्याला राजकारण करावयाचे नसल्याने आपण उपोषण सोडवले नाही, असेही आमदार म्हणाले.

राजकारणाची आम्हाला गरज नाही -माजी आमदार संतोष चौधरी
राजकारण करण्याची आम्हाला गरज नाही, त्या दहा उपोषणार्थींचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना आपण जाहिररीत्या पाठिंबा व प्रोत्साहन दिले, उपोषणस्थळी गेलो मात्र त्यांच्याजवळ गेलो नाही कारण तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे त्या तरुणांच्या जीवाचा प्रश्‍न होता, त्यांच्याशी दगा फटका होवू नये ही इच्छा असल्याने आपण सर्व बाबींवर लक्ष ठेवून होतो. तरुणांच्या लढ्याचे चीज झाले व आमचीही तीच इच्छा होती, असे माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले. अतिक्रमितांना न्याय मिळण्यासाठी यापुढेही आपला लढा सुरू राहणार असून त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागलेतरी चालेल, असा इशाराही त्यांनी दिला.