अडावदच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

0

कोरोनाच्या आपत्तीतही सर्वांना पेयजल पुरवण्यासाठी कटीबध्द !

जळगाव :- सुधारित पाणी पुरवठा योजनांच्या मंजुरीला दिलेली वाढीव मुदत उलटून गेल्यानंतरही अडावद (ता. चोपडा) येथील तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने कार्यवाही केल्याने ही योजना मंजूर करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या आपत्तीमुळे राज्यातील पाणी पुरवठा योजनांच्या मंजुरीसाठी ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत उलटून गेल्यानंतर अलीकडच्या काही दिवसांमध्ये चोपडा तालुक्यातील अडावद येथे पाणी समस्या निर्माण झाली. यामुळे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना ही योजना मार्गी लावण्याचे साकडे घातले. या अनुषंगाने ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय पाठपुरावा करून आपल्या खात्यातर्फे याला मंजुरी देण्यात आली. या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या सचिवांशी बोलणे करून अडावदच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देणारा शासन निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव पाठविला. यावर जिल्हाधिकार्‍यांनी अडावद येथील तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी ११ लाख २९ हजार ९५९ रूपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना जारी केले आहे. यामुळे अडावदकरांवरील पाणी टंचाईचे सावट दूर होणार आहे.

लॉकडाऊन सुरू असले तरी राज्यात कुठेही पाणी पुरवठा खंडीत होणार नाही याकडे आपण लक्ष ठेवून असून राज्यातील जनतेला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Copy