Private Advt

अट्रावलमध्ये पत्नीवर पतीचा धारदार शस्त्राने हल्ला

यावल : प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यामध्ये भांडण झाल्यानंतर संतप्त पतीने मध्यरात्रीनंतर आपल्या एका मित्राला सोबत घेत अट्रावलला माहेरी असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला तर सासू-सासरा व शालकाला मारहाण केल्याची घटना अट्रावलला घडली. या प्रकरणी दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
अट्रावल येथील अर्जुन सुरेश भील यांच्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी योगीता हिने दोन वर्षांपूर्वी खुशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे (रा.भुसावळ) याच्यासोबत प्रेमविवाह केला. या दाम्पत्याला एक मुलगी झाली. प्रसूतीसह भावाचे लग्न असल्याने योगीता आठ महिन्यांपासून अट्रावल येथे माहेरी होती. शुक्रवार, 3 जून रोजी तिच्या भावाचे लग्न होते. त्यात जावई खुशाल उर्फ बंटी गजानन बोरसे हादेखील आला होता. या लग्नात योगीता व खुशालचे भांडण झाले. यानंतर योगीता व मुलीला सोडून खुशाल भुसावळला निघून गेला. त्यानंतर त्याने योगीताला कॉल करून अनेकवेळा शिवीगाळ केली. मंगळवार, 21 जूनच्या मध्यरात्री नंतर खुशाल हा त्याचा मित्र अरविंद कांबळेसह अट्रावलला आला. सासरे अर्जुन भील यांच्या घरात प्रवेश करत पत्नी योगितावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. सासू-सासरे व शालकालादेखील मारहाण करून पळ काढला. यानंतर जखमी अंजूबाई (सासू) आणि योगिता (पत्नी) या दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना जळगावला हलवण्यात आले. या प्रकरणी खुशाल बोरसे व अरविंद कांबळे (रा.भुसावळ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक विनोद खांडबहाले तपास करत आहे.