Private Advt

अट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त

गोपनीय माहितीवरून पोलिसांनी आवळल्या संशयीतांच्या मुसक्या

पिंपळनेर : पिंपळनेर शहरातून दुचाकी चोरीचे सत्र सुरू असल्याने पोलीस अधीक्षकांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पिंपळनेर सहा.निरीक्षक सचिन साळुंखे यांना केल्या होत्या. या अनुषंगाने पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयीतांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरींची कबुली देत तीन लाख पाच हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी काढून दिल्या आहेत. यादु उर्फ याद्या रमेश देसाई (रा.लोणेश्वरी भिलाटी, पिंपळनेर) व अजय उर्फ आज्या शिवाजी गांगुर्डे (रा.मल्याचापाडा, पो.पानखेडा, ता.साक्री, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बुलेट चोरीनंतर संशयीत अडकले जाळ्यात
पिंपळनेर शहरातून बुलेट (एम.एच.15 जी.जे.4440) चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करतानाच संशयीत जाळ्यात अडकले. त्यांनी चोरलेल्या वाहनांना बनावट नंबर प्लेट लावत त्या कमी किंमतीत विक्री केल्याचे उघड झाले तर संशयीतांकडून चोरी केलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त दुचाकींमध्ये बुलेट, होंडा शाईन, स्प्लेंडर प्रो, होंडा पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स, बजाज डिस्कव्हर आदी गाड्यांचा समावेश आहे. चेचीस क्रमांकावरून पोलिस आता मूळ मालकांचा शोध घेत आहेत.

यांनी आवळल्या दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या
जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, साक्री पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे, धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, हवालदार प्रवीण अमृतकर, नाईक देवेंद्र वेन्द्रे, कॉन्स्टेबल रवीकुमार राठोड, कॉन्स्टेबल मकरंद पाटील, कॉन्स्टेबल भूषण वाघ, कॉन्स्टेबल ग्यानसिंग पावरा आदींच्या पथकाने दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.