अट्टल दुचाकी चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात : सात चोरीच्या दुचाकी जप्त

भुसावळ/जळगाव : भुसावळातील अट्टल दुचाकी चोरट्यास जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून आरोपीने 11 दुचाकी चोरींची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून संशयीताचा चार गुन्ह्यांप्रकरणी शोध सुरू होता मात्र दरवेळी तो पथकाला चकमा देण्यात यशस्वी होत होता. मुकुंदा डिगंबर सुरवाडे (36, ह.मु. प्लॉट नं.57, सर्वे नं.60, विवेकानंद नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीस अधिक तपासासाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कमी किंमतीत दुचाकी विक्रीचा सपाटा
संशयीत दुचाकींची चोरी करून ओळखीच्या लोकांना अवघ्या 15 ते 20 हजारात गहाण ठेवत होता. त्यासाठी नातेवाईक आजारी असल्याचे तसेच आई-वडील आजारी असल्याची बतावणी तो करीत होता.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, एएसआय अशोक महाजन, हवालदार महेश महाजन, हवालदार ललिता सोनवणे, नाईक किशोर राठोड, नाईक श्रीकृष्ण देशमुख, नाईक अविनाश देवरे, नाईक रणजीत जाधव, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल उमेशगिरी गोसावी, कॉन्स्टेबल हरीष परदेशी, कॉन्स्टेबल वहिदा तडवी, चालक हवालदार विजय चौधरी, चालक नाईक अशोक पाटील आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

चोरीच्या सात दुचाकी जप्त
संशयीत आरोपी मुकुंदा सुरवाडे याच्या ताब्यातून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात जळगाव शहर हद्दीतील दोन, कासोदा येथे दोन, एमआयडीसी पोलीस ठाणे व भुसावळ बाजारपेठ हद्दीतील प्रत्येकी एक, मध्यप्रदेशातील देवास येथील एक चोरीच्या दुचाकीचा समावेश आहे. दरम्यान, आरोपी बाजारपेठ पोलिसात तीन तर एमआयडीसी पोलिसात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यात वॉण्टेड असल्याने त्याचा शोध सुरू होता मात्र दरवेळी पोलिसांना तो चकमा देण्यात यशस्वी होत होता मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले.