अट्टल दरोडेखोर रामानंदनगर पोलिसांकडून जेरबंद; अनेक ठिकाणी टाकले दरोडे

0

जळगाव । दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल दरोडेखोराला शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास हॉटेल आदर्शच्या परिसरातून रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, त्याच्याकडून पोलिसांना एक गावठी बनावटीचा कट्टा तसेच जिवंत काडतूस मिळून आले आहे. यातच जिल्ह्यासह दोन महिन्यात चोर ठिकाणी दरोड्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याला शनिवारी न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवागनी करण्यात आली आहे.

पिंप्राळा परिसरातील आदर्श हॉटेलच्या मागच्या बाजुला एक संशयीत तरूण फिरत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी रामानंदनगर पोलिस पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडीले यांना त्या संदर्भात माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी गोपाल चौधरी, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विजय खैरे, विलास शिंदे, सुरेश मेढे, अतुल पवार, ज्ञानेश्वर कोळी यांना तपासासाठी पाठविले. आदर्श हॉटेलच्या मागच्या बाजुला एक तरूण संशयीत रित्या फिरताना त्यांना आढळला. पोलिसांनी त्याला हटकले असता. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी काही अंतरापर्यंत पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता. त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले.

पेट्रोलपंपावरुन लाख पळवले
आदर्श हॉटेल परिसरातून राहूल संदीप सोनवणे (वय 26, रा. अरिंगळे मळा, एकलहरा रस्ता, सिन्नर नाका, नाशिक) याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता तो अट्टल दरोडेखोर असल्याचे पोलिसांना चौकशीत निष्पन्न झाले. यावेळी त्याने साथीदारांसह 3 मे रोजी रात्री संगमनेर-अहमदनगर रस्त्यावरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकला होता. त्यात बंदूकिचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांच्या हातातून 8 लाख रुपये असलेली बॅग घेऊन पसार झाले होते. तर 28 फेब्रुवारी रोजी वैजापूर येथील अजिंठा वाइन शॉप यादुकानातील कर्मचारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दुकान बंद करून मालकाकडे दिवसभराचा हिशेब देण्यासाठी जाणार होते. त्यावेळी तिघांनी दुचाकीवर येऊन बंदुकीचा धाक दाखवून कर्मचार्‍याच्या हातातील बॅग हिसकावून नेली होती. बॅगेत साडेतीन लाख रुपये होते. या गुन्ह्यात राहूल याने नेरीनाका चौकातून फेब्रुवारी महिन्यात चोरली गेलेली दुचाकी वापरल्याची कबुली दिली आहे. तर पुर्वी त्याच्यावर चोपडा आणि अकोला येथेही दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तर नाशिक येथे घरफोडीचे 14 गुन्हे दाखल आहेत. राज्यात विविध जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी आर्म अ‍ॅक्ट दाखल असून त्याच्याकडून आतापर्यंत 8 गावठी कट्टे पोलिसांनी जप्त केलेले आहेत. शुक्रवारी रात्रीही तो त्याच्या साथीदारांसह शहरात किंवा आजुबाजुला दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली.

सोपराजा सोबतही केले गुन्हे…
रामानंदनगर पोलिसांनी 29 एप्रिल रोजी अट्टल घरफोट्या सोपराजा उर्फ राजेंद्र दत्तात्रेय गुरव (वय 28, रा. आसोदा रोड) याच्या मुसक्या आवल्या होत्या. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. राहूल याने विविध जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या बनवल्या आहेत. त्यात सोपराजा तसेच जिल्ह्यातील आणखी काही गुन्हेगारही त्याच्या टोळीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.