अट्टल चोरट्याला एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव : तालुक्यातील चिंचोली आणि आपना घर कॉलनीत घरफोडी केल्याप्रकरणी अट्टल चोरट्याच्या चिंचोली गावातून एमआयडीसी पोलिसांनी बुधवार, 3 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. समाधान गोकुळ सपकाळे (28, रा.मुक्ताईनगर एसएमआयटी कॉलेज, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

चोरी प्रकरणी दोन गुन्हे दाखल
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी युवराज भीमराव पवार (40) यांच्या घरात मंगळवार, 2 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री बंद घरातून दोन मोबाईल आणि पाच हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या देवाच्या मुर्त्या तर दुसर्‍या घटनेत अपना घर कॉलनीत राहणारे विजयकुमार सिंह (38) यांच्या घरातून दोन मोबाईल मिळून एकूण 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून अटक
एमआयडीसी पोलिसांनी चिंचोली गाव परीसरातून आरोपी समाधान गोकुळ सपकाळे (28, रा.मुक्ताईनगर एसएमआयटी कॉलेज, जळगाव) याला अटक केली. आरोपीने चौकशीदरम्यान दोन्ही गुन्ह्यांसह शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. संशयीत आरोपीवर पुणे शहर आणि जळगाव शहरात एकूण सहा वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. आरोपीला अधिक कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.