Private Advt

अट्टल घरफोडे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : शहरातील गणपती नगरातील सुरेश फूड वर्ल्डजवळील बंद घराचे कुलूप तोडून घरातून घरफोडी करणार्‍या चोरट्यांना शहरातील तांबापुरा परीसरातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी, 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फरीद उर्फ बुल्ली अहमद मुलतानी (रा.अजमेरी गल्ली, तांबापुरा) व श्याम सुभाष तानसर (19, रा.रामेश्वर कॉलनी, संभाजी नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बंद घराला केले होते टार्गेट
शहरातील गणपती नगराजवळील सुरेश फुड वर्ल्डजवळ असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील मौल्यवान ऐवज लांबविण्यात आल्याचा प्रकार गुरुवार, 18 नोव्हेंबर रोजी उघडकीला आला होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी जळगावात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर बुधवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी फरीदला अटक करण्यात आली व त्याने घरफोडी श्यामसोबत केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश मेढे, संदीप पाटील, संतोष मायकल यांनी केली. दरम्यान, याप्रकरणी सहाय्यक फौजदार पंढरीनाथ नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.