Private Advt

अट्टल गुन्हेगारांची टोळी धुळे एलसीबीच्या जाळ्यात : ट्रक चालकांना लुटण्याची कबुली

दोन गुन्ह्यांची कबुली : 48 हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

धुळे : महामार्गावर ट्रक चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून चौघांच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयीतांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

शस्त्राचा धाक दाखवत ट्रक चालकाला लूटले
वरखेडी उड्डाणपुलावर ट्रकचा एक्सल तुटल्यानंतर ट्रक चालक हे 27 रोजी रात्री ट्रकमध्ये झोपले असताना पाच संशयीतांनी धारदार शस्त्र दाखवून 11 हजार 500 रुपयांची रोकड व मोबाईल हिसकावला होता शिवाय तक्रारदार ट्रक चालक किरण मुरलिधर गायकवाड (36, तळवाडे, भामेर, ता.सटाणा) यांचे अपहरण करीत त्यांना एटीएममध्ये नेले होते व यावेळी पैसे काढताना चाळीसगाव रोड पोलिसांचे गस्ती पथक आल्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी संशयीतांना हटकताच चौघै पसार झाले होते तर अकबर वहाब शेख यास अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात जुम्मन रशीद शाह (26, हाजी अहमदपुरा, मालेगाव), सुदर्शन शशीकांत पाटील (वाणी, साकोरी शिव, ता.राहता), समीर अफजलखान पठाण (23, गुदवाई रोड, ईस्लामपुरा, मालेगाव) यांना अटक करण्यात आली तर 17 वर्षीय अल्पवयीन बालकास गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. संशयीतांच्या ताब्यातून 12 हजार 500 रुपयांची रोकड, 20 हजार 500 रुपयांचे पाच मोबाईल, 15 हजारांची दुचाकी (एम.एच.41 बी.बी.7710) जप्त करण्यात आली. आरोपींनी वरील गुन्ह्यासह पुरमेपाडा येथे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, आझादनगर निरीक्षक आनंद कोकरे, चाळीसगाव रोडचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, कुणाल पानपाटील, योगेश शिंदे, बाळासाहेब डोईफोडे, महाजन, खैरनार, रवीकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील, चेतन कंखरे, संदीप वाघ, शोएब बेग, रेशीवाले आदींच्या पथकाने केली.