अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव

0

मलेशिया । सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍या भारतीय पुरूष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 3-1 ने दणदणीत पराभव स्वीकारावा लागला आहे. सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंडवर दणदणीत विजय साजरा केल्यानंतर गतविजेत्या ऑस्ट्रेलियालाही भारत कडवी झुंज देईल अशी अपेक्षा होती. पण या सामन्यात भारताकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झाली नाही. सामन्याच्या दुसर्‍या हाफमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीची नोंद करून भारतावर विजयी आघाडी घेतली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. स्पर्धेत भारताची सुरूवात चांगली झाली होती. पहिल्या लढतीत 2-0 अशा आघाडीनंतरही बचावफळीतील शिथिलतेमुळे भारतीय संघाला इंग्लंडने 2-2 असे रोखण्यात यश मिळवले होते तर भारताने दुसर्‍या लढतीत न्यूझीलंडला 3-0 असे नमवण्याची किमया केली. न्यूझीलंडने पहिल्या लढतीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे भारताचे मनोबल उंचावले होते मात्र तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची डाळ शिजली नाहीच.