अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : साकळीतील 24 वर्षीय तरुण ठार

यावल : तालुक्यातील साकळी गावाच्या पुढे दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 24 वर्षीय दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. हा अपघात सोमवार, 20 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात रोहित अरुण कोळी (रा.इंदिरा नगर प्लॉट, साकळी) या तरुणाचा मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने साकळीत शोककळा पसरली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
साकळी, ता.यावल येथील इंदिरानगर प्लॉट भागातील रहिवासी रोहित अरुण कोळी (24) हा तरुण सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.14 जे.एन.2685) द्वारे साकळीवरून किनगावकडे जात असताना अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील साकळी गावाच्या पुढे असलेल्या भारत टोलनाक्या समोरील वळणावर चोपड्याकडून भरधाव वेगाने येणार्‍या एका अज्ञात वाहनाने तरुणाच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात रोहित कोळी हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक पाटील, सचिन चौधरी, नुतन बडगुजरसह आदींनी मयत रोहित कोळी याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणत व यावल पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, संजय देवरे, नरेंद्र बागुल, चंद्रकांत पाटील, राहुल चौधरी आदींनी सर्वत्र नाकाबंदी करून अज्ञात वाहनाचा शोध घेतला मात्र वाहन आढळले नाही. दरम्यान, मयत रोहित कोळी हा कुटुंबातील एकूलता एक होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिणी असा परीवार आहे.

Copy