अज्ञातांचा दाम्पत्यावर खुनी हल्ला; महिलेची बोटे छाटली!

0

देहूरोड/शिरगाव : मावळ परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी मोठी दहशत निर्माण झाली आहे. गुरूवारी रात्री तर अज्ञात हल्लेखोरांनी चारचाकीने जाणार्‍या पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला करून पत्नीची बोटे छाटली. हल्लेखोरांनी पतीवर तलवारीने केलेला वार हातावर झेलल्याने विवाहितेचा पंजा कापला गेला आहे. राणी काळोखे असे गंभीर जखमी महिलेचे नाव असून, महेंद्र काळोखे हे त्यांचे पतीदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आहेत. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सहा वर्षांचा मुलगा मात्र या हल्ल्यातून बचावला. मध्यरात्रीच्या सुमारास काळोखे कुटुंब चारचाकी वाहनातून आपल्या घरी परतत होते. त्यावेळी नायडूनगर ते माळवाडी दरम्यानच्या परिसरात दोन दरोडेखोरांनी त्यांची गाडी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेने मावळ परिसरात पुन्हा एकदा दहशत पसरलेली असून, पोलिसांबद्दल संताप व्यक्त होत आहे.

देहूरोड पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला
काळोखे कुटुंबीय बुधवारी रात्री 12.15 च्या सुमारास त्यांच्या गाडीतून जात होते. त्यावेळी दुचाकीवर असलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर या दोघांनी अचानकपणे तलवार आणि काठीने महेंद्र काळोखे यांच्यावर हल्ला चढवला. त्यावेळी आपल्या पतीचा बचाव करण्यासाठी राणी काळोखे यांनी स्वत:चा हात मध्ये टाकला. तेव्हा तलवारीच्या घावाने राणी काळोखे यांच्या हाताची चार बोटे तुटली. तर महेंद्र काळोखेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

या सर्व घटनेची माहिती स्वत: महेंद्र काळोखे यांनी जखमी अवस्थेत देहरोड पोलिसांना दिल्यावर पोलिस खडबडून जागे झाले आणि त्यांनी जखमी नवरा-बायको यांना आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. देहूरोड उपविभागीय पोलिस अधिकारी अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. या घटनेत महेंद्र आणि राणी काळोखे यांचा मुलगा सुखरूप बचावला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सध्या देहूरोड पोलिस करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे मावळ परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत मावळ आणि लोणावळा परिसरात आठ हत्या झाल्या आहेत. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिनाभरात चार खून, पोलिस करतात काय?
या महिन्याच्या सुरुवातीला 3 एप्रिलला लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये श्रुती डुंबरे (21) आणि सार्थक दिलीप वाघचौरे (22) या दोन विद्यार्थांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे, दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह हे विवस्त्र अवस्थेत आढळले होते. अज्ञाताविरोधात लोणावळा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप ग्रामीण पोलिसांच्या हाती आरोपीविषयी कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. 20 एप्रिलला तळेगाव दाभाडे येथील घोरावडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याला एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. या घटनेत महिलेचा गळा आवळून खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. हत्येनंतर तीन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

23 एप्रिलला सांगवडे येथील महिला सरपंचच्या पतीची हत्या झाली होती. मावळ तालुक्यातील सांगवडे गावात नवनाथ लिमण (32) याला लाकडी दांडक्याने मारहाण करत तलवारीचे वार करुन त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय वादातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.