अजित पवार उरले बारामतीपुरते !

0

नगरपरिषद निवडणुकांच्या दुसर्‍या टप्प्यातही भाजप हाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपच्या या यशाचे धनी अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. फडणवीस यांनी बारामतीत जाऊन अजित पवारांना पाणी पाजण्याची भाषा केली होती. ते तेथे पवारांना पाणी पाजू शकले नाहीत. परंतु, पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांनी पवारांना पाणी दाखवले. ज्या माणसांना पवारांनी मोठे केले तीच माणसे घेऊन भाजप राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. म्हणजे, भाजपचा धोका शिवसेनेला नाही तर राष्ट्रवादीला आहे, हे उघड झाले. सद्या लोकं भाजपला शिव्या घालत आहेत, परंतु मतेही देत आहेत. पक्षाचे सातत्याने होणारे पानिपत, लोकं संतप्त असताना भाजपला का मते देत आहेत, याचे चिंतन आता अजित पवारांनी करावे. राज्याचे नेते असलेले अजित पवार केवळ बारामतीपुरतेच का उरलेत? यावर त्यांनी स्वतःच मंथन करावे!

महाराष्ट्रात ज्यांना जाणते राजे असे म्हटले जाते त्या काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकून अख्खा महाराष्ट्र आपल्या टाचेखाली आणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता केवळ बारामतीपुरतेच उरल्याचे कटू परंतु धक्कादायक राजकीय वास्तव आहे. अर्थात, नगरपालिकांसारख्या छोट्या निवडणुकांच्या निष्कर्षातून अजित पवारांच्या राजकीय यशापयशाचा अंदाज लावणे आणि त्यांची राजकीय ताकद संपल्यात जमा झाल्याचे विधान करणे खरे तर मूर्खतापूर्ण ठरेल. परंतु, पवारांची राजकीय ताकद धोक्यात आली आहे, गेल्या अडिच-तीन वर्षानंतरही पवारांना जनमताला आपल्याकडे वळवता आले नाही, हे वास्तव आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणे शक्य नाही. भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद राज्यात वेगाने वाढत आहे. हाती सत्ता असली की असा परिणाम होत असतो. तसा परिणाम सत्तेत असताना राष्ट्रवादीनेही साधून घेतला होता. परंतु, सत्ता जाताच इतक्या वेगाने ओहोटी लागेल, असे कुणालाही वाटले नव्हते. छगन भुजबळ कारागृहात गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या या ओहोटीला सुरुवात झाली होती. नगरपरिषदेच्या निमित्ताने या आहोटीची तीव्रता अधोरेखित झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल तसे राष्ट्रवादीच्या पूर्णतः विरोधात गेले असेही म्हणता येणार नसले तरी, भाजपची ताकद शिवसेना आणि राष्ट्रवादीला मागे टाकून वाढली आहे, हीच ती काळजी करण्यासारखी बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय रातोरात घेऊन लोकांना पै-पैशासाठी अक्षरशः रांगेत उभे केले. लोकांच्या मनात भाजप सरकारबद्दल कमालीचा संताप खदखदत असतानाही लोकं भाजपलाच मतदान करत असतील तर याचा अर्थ काय होतो? लोकं भाजपला शिव्याही देत आहेत अन् मतेही देत आहेत! ही बाब नेमकी कशाची द्योतक आहे? राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पडले असले तरी विदर्भ वगळता इतरत्र नगरसेवक वाढले आहेत. नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याची भाजपची खेळी यशस्वी झाली आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी या नगराध्यक्षांना आता काम करणे अवघड होईल, तरीही छोटी-मोठी शहरे ताब्यात घेण्यात भाजप यशस्वी झाले, ही त्या पक्षासाठी जमेची बाब म्हणावी लागेल. मुळात पवार कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘गृहीत’ धरण्याची फार मोठी चूक केलेली दिसते. भाजप हा पक्ष शिवसेनेचे राजकीय खच्चीकरण करत आहे, असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी तसे मुळात नाहीच! फडणवीस हे सत्तेच्या माध्यमातून वारंवार राष्ट्रवादीचेच खच्चीकरण करत असून, फडणवीसांचे अस्तित्व हा राष्ट्रवादीसाठी मोठा धोका आहे, हे ओळखण्यात अद्याप तरी पवार यशस्वी झाले नाहीत. सहकारक्षेत्रावर फडणवीसांनी घातलेला घाला, राष्ट्रवादीला ठिकठिकाणी सुरुंग लावून या पक्षाची फोडलेली माणसे आणि सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेली माणसे कारागृहात घालण्याचे झालेले काम, याबाबी पाहाता पवारांना अडचणीत आणण्याची एकही संधी फडणवीस सोडत नाहीत. किंबहुना, संधी हुडकून काढून तिचे सोने करण्याचे काम मुख्यमंत्री आवर्जुन करत आहेत. छगन भुजबळांना अटक होण्याआधी शरद पवार म्हणाले होते, राज्य सरकार आम्हाला जेलमध्ये घालायला निघाले आहे. त्यावर फडणवीस यांनी अत्यंत चातुर्याने सरकारचा असा कोणताही इरादा नसून, कोणत्याही भ्रष्टाचारात अद्याप शरद पवारसाहेबांचे नाव आलेले नाही, असा खुलासा केला होता. फडणवीस यांनी अद्याप पवार कुटुंबीयांतील कुणाला हात लावला नसला तरी भुजबळांना मात्र तुरुंगात डांबले आहे. त्यातून राष्ट्रवादीचे जे ‘डॅमेज‘ करायचे होते ते करण्यात ते यशस्वीही झाले आहेत. सिंचन घोटाळ्यात अजित पवार, सुनील तटकरे यांचेही नाव आहे. परंतु, अद्याप तरी या घोटाळ्यांबाबतच्या कारवाईला हात घालण्याची हिंमत सरकारने केली नाही. सरकार तसे करणारही नाही. भ्रष्टाचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीवर शिक्का मारण्यात भाजपवाले यशस्वी झाल्याने प्रत्यक्ष काहीही कारवाई करण्याची सरकारला गरज वाटत नाही. आता ज्या नगरपरिषद निवडणुकांवरून राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेच्यास्थानी आली आहे. ते निकाल या पक्षाच्या फार विरोधात गेले असे नसले तरी अजित पवार यांना बारामतीपुरतेच मर्यादित ठेवण्याचे काम या निकालांनी केले. दुसर्‍या टप्प्यातील निकालांत 344 नगरसेवकांच्या जागांपैकी भाजपला 100, राष्ट्रवादीला 99, काँग्रेसला 64 आणि शिवसेनेला 14 जागा मिळाल्या आहेत. भाजपाखालोखाल जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्ष निवडणुकीत मात्र पक्षाला मोठा झटका बसला आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजप पुढे आला असून, राष्ट्रवादीसाठी हे काही शुभसंकेत नाहीत. दुसर्‍या टप्प्यातील 14 नगराध्यक्षांपैकी पाच नगराध्यक्ष हे भाजपचे तर राष्ट्रवादीचे केवळ दोनच नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या निकालाच्या निमित्ताने एक बाब स्पष्ट झाली, पवारांनी ज्या स्थानिक नेत्यांना राजकीय ताकद दिली होती, ते नेते नेमके काय करत होते? पवारांप्रमाणेच त्यांचीही राजकीय ताकद लयाला गेली आहे का? सत्ता बदलली की कार्यकर्ते व स्थानिक नेते सत्तेतील माणसांच्या मागे पळत असतात. परंतु, ज्या स्थानिक नेत्यांच्या बाबतीत अजित पवार मोठ्या गर्वाने सांगत होते, की ‘याला उभा कापला तरी याच्या रक्तात अजित पवारच निघेल‘ त्याच माणसांनी पवारांचा केसाने गळा कापावा ही बाब अजित पवारांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. ज्या माणसांनी भाजपला क्रमांक एकचा पक्ष बनविण्यासाठी ढोर मेहनत घेतली ती माणसे राष्ट्रवादीतूनच भाजपात गेलेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माणसे हेरली, त्यांना फोडले आणि त्यांना राजकीय ताकद दिली. तीच माणसे पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपला उभारी देत आहेत. राष्ट्रवादीची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्याच माणसांची जिरविण्यासाठी अजित पवारांनी काही नवख्यांना ताकद दिली होती. ही नवखी माणसे आज भाजपात आहेत. जुन्यांना वेसण घालण्यासाठी केलेला हा प्रयोग आज पवारांवरच उलटला असून, त्यामुळे भाजपला फायदा झाला. महाराष्ट्र आपल्या राजकीय टाचेखाली आणणार्‍या पवारांना जे पेरले तेच उगवलेले पाहण्याची वेळ आली; हा काळाने उगवलेला सूड म्हणावा लागेल. नगरपरिषद निवडणुका या काही फारशा महत्वाच्या नसतात, त्यातून विधानसभा निवडणुकीबद्दल काही अंदाज बांधणे चुकीचेच आहे, याची जाणिव आम्हाला आहे. परंतु, भाजप जोरदारपणे हात-पाय पसरत असून, त्याचा धोका शिवसेनेला नाही तर तो राष्ट्रवादीलाच आहे, हे येथे नमूद करणे हा आमचा उद्देश आहे. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष कमी निवडून आलेत, नगरसेवकही कमी निवडून आलेत; परंतु पूर्वीपेक्षा पक्षाची ताकद वाढली ही जशी जमेची बाजू आहे. तसेच, अजित पवारांनीच ज्यांना राजकारणात मोठे केले, त्यांच्याच मदतीने भाजपने राजकीय वर्चस्व सिद्ध केले. राज्यात भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरत असेल तर तो केवळ पवारांच्याच माजी कार्यकर्ते, नेत्यांच्या जोरावर ठरला आहे, हे पवारांनी लक्षात घ्यायला हवे. सत्तेचे वारे जिकडे वाहतात तिकडे फडफडणारे कार्यकर्ते, नेते वळत असतात. उद्या भाजपची सत्ता गेली तर हेच नेते व कार्यकर्ते पुन्हा अजित पवारांच्या मागे-पुढे फिरताना दिसतील. शेवटी सत्ता ही या लोकांची गरज आहे, नेता किंवा पक्ष नाही! उडाले ते कावळे होते, राहिले तेच तुमचे मावळे आहेत. सत्तेत असताना या कावळ्यांना ताकद देऊन तुम्ही आपल्याच मावळ्यांचे खच्चीकरण करण्याचे काम केले. आता आत्मपरीक्षण करा, राहिलेल्या मावळ्यांना आता तरी ताकद द्या, नाही तर भाजपचा उधळता वारू रोखणे तुम्हाला अशक्य होऊन बसेल. नगरपरिषद निवडणुकीत पुणे जिल्ह्यासारख्या तुमच्याच बालेकिल्ल्यात तुम्हाला फिरता आले नाही. कारण, तुम्हाला घरातच म्हणजे बारामतीतच जखडण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेत. त्यांनी बारामतीत येऊन तुम्हाला पाणी पाजण्याची भाषा केली होती. भलेही ते तुम्हाला बारामतीत पाणी पाजू शकले नाहीत. परंतु, जिल्ह्यात इतर ठिकाणी तुम्हाला पाणी दाखवले आहे. अजित पवार हे राज्याचे नेते आहेत. दुर्देवाने ते बारामतीचेच नेते ठरले आहेत. त्यांच्या या राजकीय पानिपताला ते स्वतःच जबाबदार आहेत.

पुरुषोत्तम सांगळे

निवासी संपादक,
‘जनशक्ति’, पिंपरी-चिंचवड
8087861982