अजिंठ्याच्या पायथ्याशी सोयगाव येथे होणार १३ वी बौद्ध धम्म परिषद

0

मुंबई : ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्ट्यिूट ऑफ पाली अ‍ॅण्ड बुद्धिझम’ या संस्थेच्यावतीने औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे अंजिठा लेणींच्या पायथ्याशी एक लाख बौद्ध बांधवाच्या सहभागाची परंपरा असलेली १३ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद शुक्रवार २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

आंबेडकरी धम्म क्रांतीच्या सुवर्णमहोत्सवी (२००६) वर्षापासून दरवर्षी अंजिठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या संस्थेच्या मालकीच्या जागेवर ही धम्म परिषद भरविली जाते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड हे या संस्थेचे अध्यक्ष असून, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो हे या संस्थेचे सचिव आहेत. जागतिक वारसा असलेल्या अंजिठा लेणी येथे या संस्थेने ७१ एकर जमीन श्रद्धावान उपासकांनी दिलेल्या दानातून खरेदी केली आहे.

नजीकच्या काळात तेथे पाली भाषेचे विश्वविद्यापीठ उभारण्याचा विचार आहे. या बौद्ध धम्म परिषदेला अनेक बौद्ध राष्ट्रामधून १०० पेक्षा जास्त भिक्खूसहित, शिक्षणतज्ज्ञ, धर्माचे अभ्यासक, संशोधक, वैज्ञानिक उपस्थित राहणार आहेत.

अखिल भारतीय भिक्खूसंघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्म परिषद पार पडणार आहे. परिषदेचे उद्घाटन दक्षिण कोरियातील डाँग बँग बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष व्यून ग्यै, ऑन व्हॅन यांच्या हस्ते होणार आहे. श्रीलंका, दक्षिण कोरिया, ब्रह्मदेष, सारनाथ, बुद्धगया, खुशीनगर, बंगळुरू, महू, कोलकाता येथील बौद्ध भिक्खूनाही या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भगवान बुद्धाची शिकवणूक आणि जगासमोरील आव्हाने या विषयावर या परिषदेमध्ये भिक्खू मार्गदर्शन करणार आहेत, असे डोंगरगावकर यांनी सांगितले.

Copy