अजनाड येथे हाणामारी ; 6 जणांवर गुन्हा दाखल

0

शिरपूर । रेतीने भरलेले ट्रॅक्टर घरासमोर खाली करु न दिल्याच्या कारणावरुन शिरपूर तालुक्यातील अजनाड गावात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील अजनाड येथील रहिवासी कलाबाई हुकूमचंद जाधव (40) यांनी रेती भरलेले ट्रॅक्टर त्यांच्या घरासमोर खाली करु दिले नाही, या कारणावरुन उत्तम बाबूलाल जाधव, नंदू बाबूलाल जाधव, पप्पू उत्तम जाधव रा.अजनाड, तिघांनी महिलेला शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच साथीदाराला हाताबुक्क्यांनी पाठीवर, पोटावर मारहाण केली. ही घटना दि.4 मे रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कलाबाई जाधव यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परस्परविरोधी केल्या तक्रारी
तर परस्परविरोधात विनोद छगन जाधव (21) रा.अजनाड, या तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रेतीचे ट्रॅक्टर खाली करु दिले नाही, या कारणावरुन कलाबाई हुकूमचंद जाधव, बिखाना हुकूम जाधव, मलाखान हुकूम जाधव रा.अजनाड, या तिघांनी तरुणाला शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. साथीदार नंदमाला जाधव हिचे डोक फोडून जखमी केले. यावरुन वरील तिघांविरुध्द भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ डी.डी. कोळी करीत आहेत.

ट्रकची ताडपत्री फाडून चोरी
साक्री । सूरत-नागपूर महामार्गावर साक्री गावाजवळ असलेल्या देवनगर पेट्रोलपंपासमोर दि.6 मे रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे 3 ते 3.30 वाजेदरम्यान ट्रक (एमएच 41/बी-6873)ची ताडपत्री फाडून दोघांनी ट्रकमधील दोन विविध रंगाच्या व प्रकारच्या साड्यांचे गठाण आणि 7 ते 8 कार्टनसह 25 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी ट्रकचालक शराफतखा ईस्माईलखा पठाण (53) रा.सनाउल्ला नगर पाटकिनार, मालेगाव यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तपकिरी रंगाच्या आयशर ट्रकवरील चालक व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्ती या दोघांविरुध्द भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना जी.एम. सोनवणे करीत आहेत.