अखेर यावल रस्त्याच्या कामाला गवसला ‘मुहूर्त’

0

नियमांना अधीन राहून जिल्हाधिकार्‍यांनी दिली परवानगी : वाहनधारकांना दिलासा

भुसावळ : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्यावरील यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या पाचशे मीटर कामाला गुरूवार, 23 जानेवारी रोजी आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला होता मात्र काही दिवसातच काम बंद पडल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती तर रस्त्याची व्यवस्थित दबाई व्हावा या कारणास्तव हे काम बंद ठेवण्यात आल्याचे त्यावेळी सांगितले जात होते व त्यानंतर 21 मार्चपासून कोरोनाचे संकट आल्यानंतर कामाला पुन्हा ब्रेक लागला होता मात्र आमदार संजय सावकारे व सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकार्‍यांकडे या रस्त्याच्या कामाबाबत रवानगी मागितल्यानंतर नियम व अटींना अधीन राहून कामाला परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारपासून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

‘जनशक्ती’ चा पाठपुरावा मोलाचा
गुरूवार, 23 जानेवारी रोजी आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत रस्ता कामाला सुरूवात झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात रस्ता कामाला ब्रेक लागला होता शिवाय या रस्त्यावरून अमृत योजनेची मेन रायझिंग गेल्याने व ती काढण्यासाठी काम रेंगाळले होते. त्यानंतर शुक्रवार, 7 फेब्रुवारीच्या अंकात ‘जनशक्ती’ने ‘यावल रस्त्याची भूमिपूजनानंतरही उपेक्षाच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून संबंधिताचे लक्ष वेधले होते तर आमदारांनी स्वतः घालून सूचना केल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली मात्र मार्च महिन्यात कोरोनाचे संकट ओढवल्याने मजूर आपापल्या गावी निघून गेल्याने कामाला पुन्हा ब्रेक लागला होता. आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे काम सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता शिवाय सा.बां.विभागानेही त्याबाबत परवानगी मागितल्याने 20 एप्रिल रोजी ती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नियम व अटी पाळून होणार काम -आमदार
कोरोनामुळे काम बंद पडले होते मात्र सा.बां.विभागाने व आपण जिल्हाधिकार्‍यांकडे काम सुरू करण्याबाबत विनंती केली होती. चार ते पाच तालुक्यांना जोाडणारा हा महत्वाचा रस्ता असून नियम व अटी पाळून रस्ता कामाला 20 रोजी परवानगी देण्यात आली आहे शिवाय ज्या कामांना आधी परवानगी मिळाल्या आहेत ती कामे आता होणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.

Copy