अखेर ‘ते’ अतिक्रमण हटविले

0

धुळे : काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले महापालिके शेजारील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे बांधकाम मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने गुरुवारी जमीनदोस्त केले. यावेळी एम.जी.धिवरे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते. या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचीत प्रकार घडला नाही. हे बांधकाम हटविल्याने दोन मार्गांना जोडणारा रस्ता पूर्णपणे मोकळा दिसत होता. यामुळे आता नागरिकांना मार्गक्रमण करणे अधिक सोपे होणार आहे. मात्र, यानंतर अध्ययन केंद्राचे संचलन करणारे एम.जी.धिवरे यांनी कालच एक पत्रक प्रसिध्दीस देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्रासाठी पर्यायी जागेची मागणी कायम ठेवून स्वतःच अतिक्रमण काढून घेत आहोत असे घोषीत केले होते. त्यानुसार सकाळी जागा खाली करुन देण्याचेही त्यांनी म्हटले होते.

पर्यायी जागा व नुकसान भरपाई द्या
१९८१ सालापासून हे अध्ययन केंद्र कार्यरत असल्याने व नगरविकास विभागाच्या ७ मे २००४ च्या शासन आदेशानुसार पर्यायी जागा व नुकसान भरपाईची मागणी मनपाकडे केली असल्याचे नमूद करुन केवळ शहरात अशांतता निर्माण होवू नये म्हणून हे बांधकाम काढण्यासाठी खाली करुन देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. या पत्रकावर एम.जी.धिवरेंसह वाल्मिकअण्णा दामोदर, संजयनाना पगारे,शशिकांत वाघ, आनंदराव बागुल, एस.आर.बागुल,सिध्दार्थ बोरसे, राजेश ओहोळ, बाबासाहेब कसबेकर,संजय बैसाणे, प्रेम अहिरे, संजय चव्हाण, सुरेशअण्णा लोंढे, शंकर खरात, भरत खरात, शिवाजी जमदाळे आदींचीही नावे होती.

मनपाची मोहीम जोरात
शिवसेनेचे भगवा चौकातील अतिक्रमित जागेत असलेले कार्यालय काढण्याची प्रक्रिया सुरु असतानाच हटविण्याची मुदत वाढवून घेतल्याचे समजले आहे. शहरातील अतिक्रमण विरोधात मनपाने धडक मोहिम हाती घेतली असून या अंतर्गत धुळे महानगर पालिकेच्या शेजारी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे बांधकाम काढण्यात येणार होते. यासाठी गेल्या आठवड्यात मनपाचे अतिक्रमण निर्मुलन पथक त्याठिकाणी गेले असता महिलांनी प्रचंड विरोध केल्याने हे बांधकाम काढता आले नाही. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात दलित नेते एम.जी.धिवरेंसह पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत चर्चेच्या फैरीही झडल्या. मात्र त्यात तोडगा निघाला नाही.

मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद
मनपा कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करुन या घटनेचा निषेध केला. विशेष म्हणजे कर्मचार्‍यांच्या या आंदोलनात महापौरांसह पदाधिकारीही सहभागी झाल्याने आंदोलन शंभरटक्के यशस्वी ठरले. त्यानंतर आज सकाळी सात वाजेपासूनच मनपा गेटजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. पारोळा रोडने मनपाकडे येणारी वाहतूक खोलगल्ली, आग्रारोड, ग.नं.२ मार्गे वळविण्यात आली. तर जुने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणार्‍या वाहनांना व पादचार्‍यांना महाराणा प्रताप पुतळा आणि राजवाडे बँकेच्या मार्गाकडून जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला. त्यानंतर १० वाजता शहर अभियंता कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे पक्क्या बांधकामावर बुलडोझर फिरविला. अर्ध्या तासात अध्ययन केंद्राचे संपुर्ण बांधकाम काढले.