अखेर तळोद्यात कोरोनाची एन्ट्री झालीच !

0

‘त्या’मुलाचा अहवाल प्राप्त
तळोदा:येथे अखेर 3 महिन्यानंतर कोरोनाने एन्ट्री केली आहे. ठाणे येथून (मुंबई) आलेल्या एका 40 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान या मुलाच्या आईचे शुक्रवारी रात्री निधन झाल्याने मुलाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, तळोदा तालुका गेल्या 3 महिन्यांपासून अधिकारी व नागरिक यांच्या समन्वयातून कोरोनापासून सुरक्षित होता. एक 72 वर्षीय वृद्ध महिला ठाणेहुन(मुंबई) 5 जून रोजी तळोद्यात आली होती. दरम्यान त्या महिलेला ताप, खोकला व श्वास घ्यायला त्रास होत होता. त्या महिलेचे शुक्रवारी रात्री दीड वाजता निधन झाले. मृत महिलेच्या 40 वर्षीय मुलाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्या मृत महिलेच्या संपर्कातील 14 जणांना आमलाड येथील विलगीकारण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहराचे लक्ष त्या 40 वर्षीय पुरुषांचा कोरोनाचा अहवालाकडे लागून होते. त्या 40 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
पुरुष निवास करीत असलेला संपूर्ण मोठा माळी वाडा परिसर बॅरिकेटिंग करण्यात आला आहे. नगर परिषदेकडून परिसरात फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी मोठा माळी वाडा परिसरात जाऊन नागरिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

तळोदा 3 दिवस बंद
प्रशासनाने 3 दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण तळोदा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाकडून तळोद्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सुरत येथून शहरात अथवा तालुक्यात इतर ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी प्रशासनाशी स्वतः संपर्क साधण्याचे आणि नागरिकांमध्ये कोरोनाचे कुठलेही लक्षण दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Copy