अखेर काँग्रेस-समाजवादीची ‘हात’ मिळविणी!

0

लखनऊ । उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्ष व काँग्रेस यांच्यातील आघाडीचा निर्णय अंतिम झाला आहे. दोन्ही पक्षांनी जागावाटप निश्‍चित केले असून, आघाडीबाबत एक-दोन दिवसांत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती दोन्ही पक्षांच्यावतीने देण्यात आली. ही निवडणूक अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात लढविली जाईल, असे काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी सांगितले.

मुलायमसिंहांच्या उमेदवारांनाही तिकीट देणार!
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मीडियाशी बोलताना सांगितले, की आपण नेहमी वडिलांचे मार्गदर्शन घेऊनच राजकीय वाटचाल करत आलो आहोत. त्यामुळे यापुढील काळातही पक्ष त्यांच्याच मार्गदर्शनात चालेल. या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी होणार असून, त्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत घेतला जाईल. त्याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच दोन्ही पक्षातर्फे लखनऊत केली जाईल, असेही अखिलेश म्हणाले. उत्तरप्रदेश विधानसभेसाठी 403 जागा असून, समाजवादी पक्ष 275 ते 280 जागांवर निवडणूक लढविण्यास तयार आहे. तर काँग्रेसला 87 ते 90 जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेस तयार असून, आरएलडी 20 ते 23 यांच्यासह जनता दल, अपना दल या पक्षांनाही जागा सोडल्या जाणार आहेत. वेगळा गट असला तरी, मुलायमसिंह यादव हे उमेदवारांची वेगळी यादी नाही, त्यांची यादी ते अखिलेश यांच्याकडे देणार आहेत. त्यांच्या किमान 38 जणांना समाजवादी पक्षाची उमेदवारी हवी, असेही सूत्राने सांगितले.