अखेर अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरुध्द गुन्हा दाखल

0

शिरपूर: तालुक्यातील नांथे ग्रा.पं.त ग्रामसेवक पदावर कार्यरत नसतांना 2 लाख 80 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याप्रकरणी ग्रा.पं.चे विस्तार अधिकारी संजय शामराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामसेवकाविरुध्द थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे, शिरपूरचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक अमोल सुभाष भदाणे यांची नांथे ग्रा.पं. येथे तात्पुरती नियुक्ती केली होती. त्यादरम्यान चाकडू ग्रा.पं.येथील अपहार प्रकरणात त्यांना निलंबित केले होते. चाकडू ग्रा.पं. प्रकरणात मागील आठवड्यात 42 लाख 42 हजार रुपयांच्या अपहार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भदाणे निलंबित झाल्यानंतर नांथे ग्रा.पं.चा कार्यभार ग्रामसेवक के.ए.बडगुजर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, नांथे येथील सरपंच यांनी 6 फेब्रुवारी 2020 रोजी ग्रा.पं.च्या खात्यावर चौदाव्या वित्त आयोगाचा जमा झालेल्या 2 लाख 80 हजार 781 निधीपैकी 2 लाख 80 हजाराची रक्कम ग्रामसेवक अमोल भदाणे यांची बदली झालेली असतांना व ते ग्रा.पं.वर कार्यरत नसतांना परस्पर बँकेतून काढून घेतल्याची तक्रार नांथे ग्रा.पं.च्या महिला सरपंच यांनी केली होती .
*ग्रामसेवकाकडून सरपंचाची दिशाभूल केल्याची तक्रार*
याबाबत प्रशासनाने चौकशी केल्यावर असे निदर्शनास आले की, ग्रामसेवक अमोल भदाणे यांनी परस्पर रक्कम आरटीजीएसद्वारा विजय ईश्वर भालेराव यांच्या खात्यावर जमा केली होती. याबाबत ग्रामसेवकाने नांथे सरपंचांची दिशाभूल करून खोटी सही आणि शिक्क्याचा वापर करून अपहार केल्याची तक्रार सरपंचांनी केली होती. यानंतर चौकशी झाल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी ग्रामसेवक भदाणे यांनी 2 लाख 60 हजारांची रक्कम सरपंच यांना देऊन ग्रा.पं.च्या खात्यावर जमा करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला होता. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार ग्रा.पं.च्या विस्तार अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामसेवक अमोल भदाणे व विजय ईश्वर भालेराव यांच्या विरुध्द अपहार आणि अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Copy