अक्षय तृतीयेनिमित्त खरेदी करण्यासाठी गजबजली बाजारपेठ

0

भुसावळ। महाराष्ट्रासह खान्देशात आखाजी या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. या दिवशी शहरासह ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया सणानिमीत्ताने शहरातील मुख्य बाजारपेठ पुर्णपणे सजली होती. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.

घागरीच्या किंमतीमध्ये झाली पुर्वीपेक्षा वाढ : अक्षयतृतीयेला मातीच्या घागरीचे महत्व पाहता शहरातील रस्त्याच्या कडलेला ग्रामीण भागातून आलेल्या घागरी विक्रीची दुकाने लागली आहेत. आधुनिक काळात घराघरात फ्रिज असला तरी अक्षयतृतीयेला मातीच्या घागरीची अगत्याने खरेदी केली जाते. घागरी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल मातीची वाहतूक, लिद, भट्टीसाठीचे इंधन व शहरात विक्रीसाठी आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च, तुटफूट व घागरी बनविण्यासाठी लागणारी मजुरी पाहता आजरोजी घागरीच्या किंमतीमध्ये पुर्वीपेक्षा वाढ होऊन 50 रुपये झाली आहे. भारतीय संस्कृतीमधील सण उत्सव रोजगार मिळवून देतात. दरवर्षी विकल्या जाणार्‍या घागरींची संख्या पाहता तेवढ्याच घागरी तयार केल्या जातात. अक्षयतृतीयेच्या महिनाभर आधीपासून घागरी बनविण्यास सुरुवात केली जाते. घागरींसोबत करवे सुध्दा आवश्यक असून त्यांचीही निर्मिती केली जाते. नव्या कोर्‍या घागरी व करवे विकणार्‍यांनी दुकाने थाटलेली असून शहरात रस्त्यालगतदिसून येतात.

गृहोद्योगाचे साहित्य विक्रीला
अक्षय तृतीयेसाठी तसेच पुढील वर्षभरासाठी पुर्वतयारी म्हणून सांजोर्‍या, कुरडया, पापड व वाळणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरु होते. महिला वर्ग या कामात लागलेल्या असता. मात्र शहरी भागात धावपळीच्या युगात अनेकांना हे काम जिकरीचे वाटते. त्यामुळे बाजारात विक्रीला येणर्‍या सांजोर्‍या, कुरडया, पापड यावर भर दिला जातो. यामुळे हे साहित्य बनविण्याचे गृहउद्योग सुरु आहेत. असे साहित्य सुध्दा बाजारात विक्रीला आले आहे.