Private Advt

अकलूदजवळ दुचाकींच्या धडकेत दोघे तरुण ठार

यावल : यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ भरधाव दोन दुचाकींमध्ये धडक होवून झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात राजकुमार तायडे (30, पाडळसे) व राहुल वारूडकर (22, बेलव्हाय, ता.भुसावळ) यांचा तरुणांचा मृत्यू झाला.

भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकल्या
शुक्रवार, 30 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फैजपूरकडून (दुचाकी क्रमांक एम. एच. 19 बी डी. 7558) वरून राहुल अरुण वारुडकर (22, रा.बेलव्हाय, ता. भुसावळ) हा तरुण भुसावळकडे जात असतानाच भुसावळकडून फैजपूरकडे राजकुमार दिलीप तायडे (30, रा.पाडळसा, ता.यावल) हा तरुण दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी. बी. 5160) ने जात असताना दोघा दुचाकींची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात राजकुमार दिलीप तायडे (30, रा.पाडळसा) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर राहुल वारुडकर (22, रा.बेलव्हाय) हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्यास गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवत असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच फैजपूरचे सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख, सहायक फौजदार हेमंत सांगळे, हवालदार सुधाकर पाटील, विनोद चौधरी, गुलबक्ष तडवी पथकासह दाखल झाले. मयत राजकुमारचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातलगांना सोपवला. या अपघात प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.