अंध दिव्यांगाना सोलापूर चादरींचे मोफत वाटप

0

चाळीसगाव । येथील रेड स्वस्तिक सोसायटी तर्फे नुकतेच तालुक्यातील शेकडो अंध दिव्यांगांना मोफत सोलापूर चादरींचे वाटप सिंधी हॉल, रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले. प्रसंगी अपंग कल्याण संस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षीताई निकम अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुक्याचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, नगरसेवक रामचंद्रभाऊ जाधव, नगरसेवक बाळूभाऊ मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, जिल्हा साथरोग शास्त्रज्ञ डॉ. बाळासाहेब वाबळे, आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते रोटे. मा.रविभाऊ शिरूडे, राष्ट्रीय अंध महासंघाचे सरचिटणीस पी.बी. जाधव , साहेबराव पगारे, श्री वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी रोटरी मिलेनियम,चाळीसगाव सेक्रेटरी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी 25 चादरींचे प्रायोजकत्व स्विकारून सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे नगरसेवक श्री जाधव यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते मयूर जाधव यांचेसह अनेकांनी चादरींचे प्रायोजकत्व स्विकारून रेड स्वस्तिकला मदत आनंदराव साळुंखे यांनी आभार मानले. उपस्थित अंध बांधवांमधून ज्या अंध व्यक्तींना बुब्बुळ पांढरे झालेने दृष्टी गेली आहे, त्यांच्या बुब्बुळ रोपणाच्या शस्त्रक्रिया लवकरच जळगाव येथे मोफत करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती रोटरीचे डॉ.प्रमोद सोनवणे यांनी सांगितली. सदर बुब्बुळ रोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रूग्णालयात सुमारे 80 हजार रुपये खर्च लागतो, तरी या संधीचा लाभ जास्तीत जास्त अंध व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री आनंदातात्या साळुंखे व डॉ.प्रमोद सोनवणे यांनी कार्यक्रम प्रसंगी केले.