Private Advt

अंतुर्लीत सभागृहाचे उद्घाटनाला नाराजी नाट्य : राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी उपस्थिती टाळली

मुक्ताईनगर : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे आमदार असताना 2018-2019 मध्ये त्यांच्या प्रयत्नातून 25/15 या हेडखाली अंतुर्ली येथे राम मंदिर सभागृहासाठी निधी मंजूर झाला होता व नुकतेच त्याचे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर रामनवमीचे औचित्य साधून रविवारी उद्घाटन करण्यात आले. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याहस्ते सभागृहाचे उद्घाटन झाले मात्र या कार्यक्रमावर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची नावे नसल्याने त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. केवळ भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले मोजकेच पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

पदाधिकार्‍यांनी टाकला कार्यक्रमावर बहिष्कार
लोकार्पण शिलालेखावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाध्यक्ष, मावळते सभापती व तालुक्यातील पदाधिकार्‍यांची नावे असायला हवी होती, असे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ म्हणाले होते तर याच नाराजीच्या भावनेतून एक दिवस आधी बैठक घेतल्यानंतर पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमास न जाण्याचे ठरवल्याने मोजक्याच पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. राष्ट्रवादीतही जुना व नवा गट असा वाद सुरू झाल्याचे येथे पहावयास मिळाले आहे.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास भाजप ज्येष्ठ नेते होमराज महाजन, प्रशांत होमराज महाजन, कैलास दूट्टे, मिलिंद महाजन, मोहन सुधाकर महाजन, निवृत्ती पाटील, विकास पाटील आदींची उपस्थिती होती.

खडसे म्हणाले ; प्रोटॉकॉलप्रमाणे कार्यक्रम
नियमाप्रमाणे कुणाचे नाव कोणशीलेवर असावे याबाबत शासनाचा प्रोटोकॉल असतो व तो पाळण्यात आला आहे. इतरांचीही नावे कोनशीलेवर असावीत, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे कारण हा पक्षाचा कार्यक्रम नाही तर शासनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे सरकारी काम असल्याने शासकीय प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आहे. नेमकी माहिती जाणून घेवू व नाराजी पदाधिकार्‍यांची समजूत काढण्यात येईल, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.