अंजाळे येथे पूर्व वैमनस्यातून तरूणाची हत्या

0

यावल । तालुक्यातील अंजाळे येथे पुर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाची अज्ञात हत्याराने डोक्यावर वार करुन हत्या केल्याची घटना 1 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अंजाळे शिवारातील मोर नदी पुलावर घडली. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या क्रूर हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तीक्ष्ण हत्याराने केले डोक्यावर वार
अंजाळे येथील रहिवासी धनराज त्र्यंबक सपकाळे (वय 45) याचे पप्पू वसंत सपकाळे यांच्याशी पूर्ववैमनस्य असल्याने पंढरीनाथ तुळशीराम सपकाळे व पप्पू भास्कर सपकाळे यांनी अंजाळे शिवार मोर नदी पुलावर दक्षीण कोपर्‍यावरील रस्त्याच्या मध्यभागी धनराज सपकाळे हे काहीतरी काम करीत असताना याठिकाणी अज्ञात हत्याराने डोक्यावर वार करण्यात आल्यामुळे ते जागेवर मयत झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात विजय त्र्यंबक सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन यावल पोलीस स्थानकात दोघा आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून धनराज त्र्यंबक सपकाळे यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.