अंजनी प्रकल्प वाढीव जलसाठा कितपत सत्य?

0

एरंडोल। तालुक्यातील पळासदळ येथील अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले असून मूळ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मूळ प्रकल्पात बुडीत होणार्‍या धारागीर व वडधानोरी या दोन गावांचे पुनर्वसन राष्ट्रीय महामार्गालगत यापूर्वीच झाले आहे. मात्र वाढीव उंचीत बुडीत होणार्‍या हनमंतखेडा बुद्रुक, सोनबर्डी, मजरे या तिन गावांचे अद्यापपर्यंत पुनर्वसन झालेले नसल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊ शकत नाही. त्यामुळे अंजनी प्रकल्पाच्या वाढीव जलसाठ्या बाबत खरे किती खोटे किती-असा प्रश्न धारागीर पुनर्वसन सहाय्यक समितीचे अध्यक्ष जयवीरसिंह पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अंजनी प्रकल्पाचे काम वाढीव उंचीसह पूर्ण झाले आहे. मुळ प्रकल्पाच्या कामास तत्कालीन युती सरकारच्या काळात गती मिळाली होती. महेंद्रसिंह पाटील हे विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील त्यांनी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले होते. माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी पावसाळ्यात गिरणा नदीचे जामदा बांधार्‍यावरून वाहून जाणारे पाणी जामदा डाव्या कालव्याद्वारे अंजनी प्रकल्पात आणून अंजनी प्रकल्पाचा जलसाठा वाढवता येईल असे तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांना पटवून दिले होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता वाढीव जलसाठ्याच्या सर्वेक्षणाचे आदेश अधिकार्‍यांना दिले होते. संबधित अधिकार्‍यांनी माजी आमदार पाटील यांनी केलेली सूचना योग्य असल्याचा अहवाल श्री खडसे यांना सादर केला होता. श्री. खडसे यांनी त्वरित वाढीव जलसाठ्याच्या कामांना मंजुरी देवून प्रत्यक्ष काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वाढीव जलसाठ्यासाठी धरणाच्या दोन्ही बाजू उंचावण्यात आले आहे.

पुनर्वसनासाठी गावकर्‍यांच्या संमती नसल्याचा आरोप
माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी स्वतःच्या धारागीर व वड धानोरी या दोन गावांचे कोणताही विरोध न करता पुनर्वसन करून शासनास सहकार्य केल्यानंतर अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली. मात्र 1999 नंतर प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणार्‍या तीनही गावांच्या पुनर्वसनाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊ शकला नाही. मात्र विद्यमान आमदार डॉ.सतीश पाटील यांनी प्रकल्पाबाबत विधानसभेत मांडलेल्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशाबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु आहे. कारण वाढीव उंचीत बुडीत होणार्‍या हनमंतखेडे बुद्रुक, सोनबर्डी-मजरे यातीन गावाच्या पुनर्वसन करणेकामी अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. पुनर्वसनासाठी तीनही गावातील गावकर्‍यांच्या संमतीने जागा निवडलेली नाही. जागेचे संपादन देखील झालेले नाही. त्यामुळे तीनही गावे मूळ जागेवरच असताना त्यांना पुनर्वसित म्हणणे व पुनर्वसित गावांना नागरी सुविधांची मागणी करणे व मंत्र्यांनी याबाबत कुठलीही माहिती न घेता आदेश देणे यामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहे. प्रकल्पाच्या वाढीव उंचीमुळे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव तालुक्याला लाभ होणार असल्यामुळे त्यांनी देखील या प्रकल्पा बाबत सकारात्मक दृष्ट्या पाहून तिनही गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.