अंजनी धरणात बुडून तिघांचा मृत्यू

0

एरंडोल । येथील अंजनी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल 1 मेरोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असून पळासदड, धारागीर, खडकेसिम येथील सहा तरुणांनी पंचवीस मिनिटांत या तिघाही युवकांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी हजारो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती .मरण पावलेल्या तरुणांच्या नातेवाईकांचा आक्रोश सर्वांचे मन हेलाऊन टाकणारा होता.

खोेलीचा अंदाज चुकला
काल दुपारी सिद्धिकेश राहुल ठाकूर (वय15), रोहित राहुल ठाकूर (वय14), आकाश सुभाष चौधरी (वय14) व शाम संजय महाजन हे चार मित्र अंजनी प्रकल्पात पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यापैकी सिद्धिकेश ठाकूर, रोहित ठाकूर व आकाश चौधरी हे तिघे पोहण्यासाठी धरणात उतरले तर चौथा मित्र शाम महाजन हा कपडे काढत असतांना त्याचे लक्ष तिघांंकडे गेले. तिघेही मित्र बुडत असल्याचे त्याला दिसले.हे तिघेही तरुण एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. प्रकल्पातील गाळ काढलेला असल्यामुळे वीस फुट खोल खड्डयाचा जलसाठा असल्यामुळे तिघाही तरुणांचा दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला.

प्रतिष्ठितांकडून सांत्वन
या दुर्घटनेत मरण पावलेले सिद्धिकेश ठाकूर व रोहित ठाकूर हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांचे पश्‍चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे. आकाश चौधरी हा आजी, आजोबांकडे रहात होता. त्याचे आई- वडील, एक भाऊ,एक बहीण शिरपूर येथे राहतात. आमदार डॉ.सतिष पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी मृत तरुणांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. वृषल ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे तपास करीत आहेत. यापूर्वीदेखील अंजनी प्रकल्पात पाच महिलांसह दहाजण बुडून मरण पावले असून प्रकल्पस्थळी कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.सुरक्षा रक्षक नियुक्तीची मागणी होत आहे.

6 जणांची पोलिसांना मदत
काठावर असलेल्या शाम महाजन यास तिघेही मित्र बुडत असल्याचे दिसल्याने त्याने रवींद्र चौधरी यांना मोबाईलवरून माहिती दिली. चौधरी यांनी त्वरित पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे यांना माहिती दिल्यानंतर बैसाणे, हवालदार बापू पाटील, शिवाजी पाटील, सुनील वानखेडे, अकिल मुजावर व धनंजय सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. वृत्त गावात समजताच हजारो नागरिकांनी धरणावर गर्दी केली. पळासदड, धारागीर व खडकेसिम येथील दीपक भिका पवार, संजय पंजू पवार, रवींद्र धना ठाकरे, बाळू सुकलाल ठाकरे, हरी शामसिंग जोगी या तरुणांनी अर्ध्या तासात तिघाही बुडालेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.

मृतदेह काढणारेही जखमी
मृतदेह काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणांनादेखील दगडांचा मार लागून त्यांच्या पोटाला व छातीला जखमा झाल्या. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, नगरसेवक कृणाल महाजन, योगेश महाजन, माजी नगरसेवक प्रकाश महाजन, युवा सेनेचे अतुल महाजन, प्रकाश चौधरी, प्रशांत महाजनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तलावात बुडून तरूणाचा मृत्यू

जळगाव- सुप्रिम कॉलनी भागातील अमित कॉलनी येथील रहिवासी संजय प्रजापती हा सोमवारी कामगार दिनानिमित्त कंपनीला सुटी असल्याने तो घरीच होता. सुटी असल्यामुळे संजय हा मेहुणा राजू लालबिहारी प्रजापती (वय-28, रा.अयोध्या नगर), मित्र अमृत देवंद्र प्रजापती (वय-18) व आनंद लाला गोड (वय-19) दोन्ही रा.सुप्रीम कॉलनी) असे चौघे जण सोमवारी दुपारी मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले. संजय याला पोहता येत नसल्याने तो गणेश घाटावरच बसून होता. सर्व जण पोहत असताना त्यालाही पाण्यात उतरण्याचा मोह सुटला. त्यामुळे तो घाटावरून पाण्यात उतरताच खोल खड्ड्यात गेल्याने गचांडी खाऊ लागला. यातच पोहता येत नसल्याने पाण्यातच बुडून मृत्यू झाला.