अंगावरून वाहन गेल्याने पार्किंगमध्ये एकजण ठार

0
चिंचवड : पार्किंगच्या मोकळ्या जागेत झोपलेल्या व्यक्तिच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री साडेनऊ ते गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली. भाऊराव वस्ताद घरबुडे (वय 40, रा. चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घरात जागा नसल्याने…
भाऊराव वाल्हेकरवाडी मधील चिंतामणी चौकातील चाळीमध्ये राहतात. ते सिमेंटच्या गाडीवर मजुरी काम करत होते. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. घरात झोपण्यासाठी जागा नसल्याने बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते घराजवळील पार्किंग परिसरात झोपले. रात्री झोपेत असताना अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. वाहनाचे चाक भाऊराव यांच्या छाती आणि हातावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शेजारी राहणार्‍या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांची ओळख पटली आहे. परंतु करमाळा वरून त्यांचे घरचे नातेवाईक आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे शेजारी राहणार्‍या नातेवाईकांनी सांगितले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
Copy