अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणास गती

0

यावल : शहरातून गेलेल्या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयापासून ते थेट चोपडा रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयापर्यंत यावल शहरातून गेलेल्या राज्यमार्गाचे अंतर सुमारे एक किलोमीटर आहे. या ठिकाणी खडी बर्‍याच दिवसांपासून खडी टाकण्यात आली होती मात्र काम सुरु होत नसल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता.

यावलमध्ये राज्यमार्गाच्या कामाला गती देण्यात आली आहे. शहरात फैजपूरकडून येताना मनुदेवी मंदिर, बसस्थानकाच्या दोन्ही बाजू, भुसावळ टी-पॉइंट, बुरूज चौकाच्या दोन्ही बाजू, आठवडे बाजार इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कूल येथे गतिरोधक अत्यावश्यक आहेत.

गतिरोधकासाठी बांधकाम विभागाला पत्र
या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम केंद्रीय रस्ते निधीतून सुरू आहे. त्यात रस्त्याचे रुंदीकरण मजबुतीकरणदेखील होत आहे. मात्र, वर्दळीच्या ठिकाणी या रस्त्यावर गतिरोधक असावे, अशी मागणी आहे. कारण शहरातील रहदारी तसेच शाळेकडील मार्ग, बाजारपेठेतील रस्ता, अशा जोड रस्त्यांवर दिवसभर वर्दळ असते. ही गर्दी पाहता राज्यमार्गावरून सुसाट धावणार्‍या वाहनांवर वेगमर्यादा असावी म्हणून गतिरोधक गरजेचे आहेत. अन्यथा, अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्पूर्वी शहर काँग्रेस, तत्कालीन नगराध्यक्ष अतुल पाटील यांनीदेखील गतिरोधकाच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. आतादेखील काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, राहुल बारी, अनिल जंजाळे, विवेक सोनार, अमोल भिरूड, जलिल पटेल आदींनी या मागणीचा पुनरुच्चार केला. त्याची दखल घेणे अपेक्षित आहे.