Private Advt

अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गाचे लवकरच नूतनीकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही : साकळीचे डॉ.सुनील पाटील यांनी दिले जामनेर भेटीप्रसंगी निवेदन

यावल : गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन प्रमुख राज्यांना जोडला जाणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर या राज्यमार्गाला अलिकडेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ब असा दर्जा देण्यात आला असलातरी महामार्गावरील तळोदा-शहादा- शिरपूर- चोपडा -यावल-रावेर या जवळपास 240 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या संदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी साकळीचे डॉ.सुनील पाटील यांनी जामनेर भेटीवर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या रस्त्याची दुरुस्ती थांबवण्यासंदर्भात दखल घेण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन यावेळी गडकरी यांनी दिले.

रस्त्याचा कायापालट होण्याची अपेक्षा
जामनेर येथे नुकताच माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कन्येचा विवाह पार पडला. या विवाह समारंभसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी साकळीचे भाजपा कार्यकर्ते डॉ.सुनील पाटील यांनी गडकरी यांची भेट घेवून महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात चर्चा केली तसेच लेखी निवेदन देवून रस्त्यांची दुरवस्था थांबवण्याची विनंती केली. याप्रसंगी गडकरी यांनी सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन दिले.

चौपदरीकरण करा अथवा दुरवस्था थांबवा
राज्यात महामार्गाचे जाळे विस्तारले जात असलेतरी अंकलेश्वर महामार्ग अपवाद ठरला आहे. भौगोलिकदृष्ट्या चौपदरीकरण शक्य नसल्यास रुंदीकरण, दर्जोन्नतीकरण व संपूर्णपणे नूतनीकरण (दोन पदरीकरण का असेना) या मार्गाचे काम करण्यात यावे, अशी मागणी (केंद्रीय भूपृष्ठ, परीवहन, रस्ते, महामार्ग विकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यावेळी करण्यात आली.