अँबी व्हॅलीमध्ये जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू !

0

पुणे : मावळ तालुक्यातील अँबी व्हॅलीमध्ये शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यातून सुटण्यासाठी केलेल्या धडपडीत तो जखमी झाला आणि यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मावळ तालुक्यातील अॅबी व्हॅलीजवळील विसाघर येथील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी वन विभागाला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास याची माहिती दिली. गावाजवळ बिबट्याचा मोठा आवाज येत आहे. हा निरोप मिळताच वन विभागाच्या रेंज अधिकारी अंकिता तरडे व त्यांचे सहकारी पौड कार्यालयातून निघाले. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ते घटनास्थळी पोहोचले. मात्र, तत्पूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर आज सकाळी या बिबट्याला ग्रामस्थ, सहारा अॅबी व्हॅलीचे कर्मचारी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात आणले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले असून त्या ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याबाबत तरडे यांनी सांगितले की, बिबट्याच्या शरीरात मागच्या बाजूला तार शिरली असून त्यातून सुटका करण्यासाठी त्याने खूप धडपड केली. त्याच्या खुणा आजूबाजूला दिसून येत आहे. आवाजाने घाबरल्याने व रात्र असल्याने लोकांनी पुढे जाऊन पाहिले नाही. नाही तर त्याला वाचविता आले असते.